माझी गॅलरी... भाग 11 (म्हातारपणाचं बालपण)


म्हातारपणाचं बालपण….
 
🖊️🖊️🖊️🖊️आज सकाळीच गॅलरीत बसलो होतो. हातामध्ये कॉफी होतीच आणि  बाहेर पावसाची रिपरिप सुद्धा सुरूच होती. पण का कुणास ठाऊक आज कशातच मन रमत नव्हते. माझ्या गॅलरीतून हिरवागार निसर्ग पाहून उल्हासित होणारे मन आज शांत होते. समोर टेबलावर एक मासिक पडले होते ते घेऊन चाळू लागलो त्यामध्ये हृदयाला भिडणारा असा एक प्रसंग वाचनात आला. तो प्रसंग असा….
         …..एका मोठ्या आलिशान दिवाणखान्यात ऐंशी वर्षाचे वृद्ध वडील सोफ्यावर बसलेले होते, पलीकडे डायनिंगवर त्यांचा चाळीस वर्षाचा मुलगा पेपर वाचत नाष्टा करत होता. तिथेच दहा वर्षाचा नातूदेखील वडिलांसोबत नाश्ता करत होता. इतक्यात खिडकीत एक कावळा येऊन बसतो. वृद्ध वडील आपल्या साधारण चाळीशी पार केलेल्या मुलाला विचारतात, "तो कोणता पक्षी आहे ?"  मुलगा चकित होतो, की वडिलांना इतके पण माहीत नाही ? की माझी फिरकी घेताहेत ?? पण जाऊ द्या, असे म्हणत मुलगा शांतपणे उत्तर देतो, "बाबा, तो कावळा आहे" दोन मिनिटे जातात. तो कावळा "काव काव" ओरडतो. यावर वृद्ध वडील पुन्हा मुलाला विचारतात,  "तो कोणता पक्षी आहे ?" आता थोडा वैतागून मुलगा म्हणतो, "अहो!  तो कावळा आहे" पाच मिनिटे जातात. पुन्हा वडील  मुलाला विचारतात,  "तो कोणता पक्षी आहे ?"  आता हातातला पेपर बाजूला करून, मुलगा चिडून म्हणतो, "कितीदा सांगू तुम्हाला  ? की तो कावळा आहे म्हणून? यावर पुन्हा दोन चार मिनिटे गेल्यावर पुन्हा वडील  मुलाला विचारतात,  "तो कोणता पक्षी आहे ?"
यावर मात्र मुलाचा संयम संपतो. तो हातातला पेपर ताड्कन खाली फेकून वडिलांना जोरात म्हणतो, "चार वेळा तुम्ही विचारलंय आणि मी सांगितलंय तुम्हाला की तो कावळा आहे. आता मला पेपर वाचू देणार आहात की नाही ? की उठून जाऊ इथून बाहेर ?"
         वृद्ध वडील हळूच उठतात आणि आतल्या त्यांच्या खोलीत जाऊन खुर्चीवर बसतात. समोर... ते नेहमी लिहीत असलेली रोजची डायरी असते. त्यातले एक पान काढून वाचत असतानाच त्यांचा लाडका नातू हळूच तिथे येतो. आजोबाच्या मागून तोही डायरी वाचू लागतो. आणि अचानक पुढे होऊन ती डायरी उचलून तो पळत बाहेरच्या खोलीत वडिलांकडे येतो. त्या डायरीतील "ते" पान वडिलांसमोर धरतो. वडील वाचू लागतात....
"सकाळी पेपर वाचत असताना एक छान प्रसंग माझ्यासोबत घडला. आज माझा 6 वर्षाचा मुलगा मांडीवर येऊन बसला. समोरच्या झाडावर एक कावळा येऊन काव काव करू लागला. मुलाने मला तब्बल चोवीस वेळा विचारले की ते काय आहे ? कोणता पक्षी आहे ? आणि मीही हातातला पेपर बाजूला करून ठीक चोवीस वेळा त्याला उत्तर दिले. आणि प्रत्येक वेळी मी त्याला उत्तर दिल्यावर जवळ घेऊन पापा देत गेलो. आणि तो खुश होत गेला. यात आमचा अर्धा तास खूप छान गेला.
          हे वाचून नकळत त्या चाळिशीतल्या मुलाचे डोळे पाणावले आणि ते अश्रू डायरीच्या पानावर ओघळू लागले. त्याचबरोबर डायरीतील पुढची अक्षरे डोळ्यातल्या अश्रूंमुळे धूसर होत गेली. तो ताडकन उठला आणि आत जाऊन बाबांच्या मिठीत विसावला. 
           वृद्धपण म्हणजे जणू दुसरे बालपण असते. म्हणून आपण ज्यांच्यामुळे घडलो, मोठे झालो, त्या आई-वडिलांना त्यांच्या वृद्धपणी "लहान" समजून वागवनं ही आताची गरज आहे. नात्यात जीवन जन्मते आणि जीवनात नाती फुलतात. म्हणून या नात्याला आपल्याला जपायचंय !!
           हा प्रसंग वाचून झाल्यानंतर मला समजलं की माझे देखील डोळे काहीसे ओलावले होते. आणि मन भरून आलं होतं.……….

                                                 रोहित पाटील
                                               9421345159

माझी गॅलरी ..(भाग 10)


माझी गॅलरी.. (भाग 10) 
        
        रात्रभर पावसानं थैमान घातलंय. सकाळ झाली तरी थांबायला तयार नव्हता शाळेला सुट्टी होती ते एक बरं होतं. गॅलरीत राहून एक नजर मारली तर सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते.  काल विचार केला होता की उद्या सुट्टी आहे सकाळी निवांत गावात फेरफटका मारून यायचं पण रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने माझ्या प्लॅनिंग वर पुरते पाणी फिरवले होते. काय करावं सुचत नव्हतं. सहज माझ्या कपाटातला थोडा अनावश्यक कचरा काढावा या हेतूने कपाट उघडले आणि त्यामध्ये माझ्या सगळ्या डायऱ्या अगदी व्यवस्थित ठेवल्या होत्या. त्यांना बघून मी पुन्हा प्लॅन बदलला आणि  त्यातली एक डायरी काढली बाहेर येऊन बायकोला कॉफी साठी हाक मारली आणि गॅलरीत येऊन बसलो. 2016 ची डायरी होती ती. बाहेर पाऊस अजून सुरूच होता. 
           डायरी वाचायला लागलो वाचता वाचता एक पानावर आलो. ते पान होतं सोमवार दिनांक 18 जानेवारी 2016 या दिवसाचं. त्यावेळी माझी बदली भोसे हायस्कुल येथे झाली होती. तो दिवस मला आजही आठवतोय. त्या दिवसानंतर मी सुद्धा बऱ्यापैकी माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला होता. कारण तो प्रसंगच तसा होता 
          असा एक प्रसंग मी पाहीला की त्यामुळं मन अगदी भरून आलं.काही लोकांची परिस्थिती अशी का असते ? ज्याला सर्व सोयी असतात तोही कशाचा तरी भुकेला असतो. आणि ज्याला कुठल्याही सोयी नसतात तोही भुकेला असतो. कारण आयुष्याची सुरूवात करणारा 2-3 वर्षाचा मुलगा आपल्या वडीलांना मदत करण्यासाठी हातात धरता येत नसताना कोयता उचलतो. हे दृश्य पाहून एक विचार मनात येतो की ,काय त्या 2-3 वर्षाच्या मुलाला कळत असणार आहे की माझ्या वडीलांची परिस्थिती अशी आहे.त्याची 5-6 वर्षाची बहीण वडीलांच्या मागे पाला गोळा करुन पेंडी बांधत होती आणि हे सगळं पहात असतानाच मला माझ्या मुलीची आठवण झाली  आणखी थोडा वेळ जर मी त्या ठिकाणी राहिलो असतो डोळ्यांत अश्रू आल्यावाचून राहिले नसतं एवढं नक्की. एखाद्या च्या नशिबी इतकं दारिद्रय येतं आणि ते लोक सुद्धा त्याचा समर्थपणे सामना करण्याचं सामर्थ्य अंगी बाळगून शेकडो किलोमीटर दूर आपल्या कुटुंबासह येतात आणि आपल्या आयुष्याची गणितं जुळविण्याचा प्रयत्न करतात. 
         अशाच एका कुटुंबाची आज ओळख झाली जे आमच्या शाळेच्या शेजारी असलेला ऊस तोडायला आलेले आहे. त्यांच्या मध्ये एक 2-3 वर्षाचा मुलगा होता. मी थोडा वेळ त्या मुलाकडे बघत राहिलो, पहिल्यांदा तो मला पाहून त्याच्या मोठ्या बहीणीजवळ पळाला. काही वेळाने मी पून्हा तिथे गेलो.मला पाहून तो पून्हा लपायला लागला. मी त्याला बोलवलं आणि चॉकलेट दिलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हास्य आलं ते हास्य कुणाच्या मनात आलं तरी पाहता येणार नाही अस होतं.
        पण मी जेव्हा पहिल्यांदा त्या मुलाला बघितलं तेव्हा त्याच्या हातात कोयता होता आणि त्याच्या वडिलांना मदत करण्याचा प्रयत्न करीत होता.  तो प्रसंगनेच मला इतका विचार करण्यास प्रवृत्त केलं.

                                                         रोहित पाटील
                                                      9421345159

माझी गॅलरी ...भाग 9 (सुचलेलं थोडं...)


🖊️🖊️🖊️

माझी गॅलरी...भाग 9 (सुचलेलं थोडंसं...…)

           आज गॅलरीत बसून मी लिहीत होतो. थोड्या वेळापूर्वी पाऊस पडून गेला होता. माझ्या घराच्या शेजारी असलेल्या वृद्धाश्रमातील काही लोक फिरायला बाहेर पडलेले दिसले. तिघेजण होते मला त्यांची चांगली ओळख होती कारण माझं देखील वृद्धाश्रमात नेहमीचं येणं-जाणं होतं. त्या तिघांच्या घरची परिस्थिती देखील थोडीफार मला माहित होती तिघांची ही घरची परिस्थिती अगदी चांगली होती. तरी पण हे लोक इथे वृद्धाश्रमात का? असा विचार मनात आला. आयुष्यभर त्यांनी आपल्या मुलाबाळाना तळहाताच्या फोडी प्रमाणे जपलं असेल मग आता त्यांच्यावर ही वेळ का यावी. हे सगळं बघून माझ्या मनात एक विचार आला, आयुष्य खुप सुंदर आहे असं म्हणतात. आणि ते खरंच आहे. पण हे आयुष्य सर्वांसाठी सुंदर असते का? माझं आयुष्य खुप सुंदर आहे असं म्हणणाऱ्यानी खरे तर या प्रश्ना बद्दल थोड़ा तरी विचार केला पाहिजे असे मला वाटते.मी पण थोडा विचार केला . 
           पहिल्यांदा असं मनात आलं की, खरच किती लोक असा विचार करत असतील, आमच्या मित्रांकडून मी ऐकतोय की अगदी लहान मूले सुद्धा कोणत्यातरी आजाराने मृत्युच्या दारात उभे असतात. त्यांच्या तर आयुष्याची सुरुवात असते. आयुष्याच्या प्रकाशवाटेवरुण चालत असताना थोड्याच् अंतरावर असलेल्या थांब्यावर त्याना कायमची विश्रांती घ्यावी लागते. अशांचं आयुष्य खरंच सुंदर असेल का. सम्पूर्ण आयुष्य आपल्या मुलाबाळासाठी कष्ट केलेल्याना आज वृद्धाश्रमात राहावे लागते मग अश्या लोकांच्या मनात कधी येत असेल का की आपलं आयुष्य सुंदर आहे ?
           पण आणखी थोडा विचार केल्यानंतर एक गोष्ट माझ्या मनात आली की, आयुष्य सुन्दर व्हायला परिस्थिति कारणीभूत नसते तर कारणीभूत असतात त्या मनातील भावना. कारण कित्येकदा मी माझ्या घरासमोर हे चित्र बघतो की , वृद्धाश्रमातील ते वृद्ध ना ओळख ना पाळख पण माझ्या मुलीला कडेवर घेऊन स्वतःच्या नातवंडाना खेळवन्याची इच्छा पूर्ण करुन घेतात. आणि ते पाहत असताना असे मनात येते की आयुष्य सुंदर बनविनं म्हणतात ते हेच.   झोपड़पट्टीतील लहान मुले बागेत बागड़ताना कधीच त्यांच्या चेहऱ्यावर घरची परिस्थिति दिसून येत नाही अगदी मनसोक्त खेळताना ते दिसतात. त्यांचे ते दिवस,  त्यांचे ते आयुष्य खुप सुंदर असते. आणि ते सुंदर आयुष्य आपोआप झालेले नसते तर ते त्यांनी स्वतः करून घेतलेले असते. 
             थोडक्यात, एवढंच की आयुष्य सुंदर हे आपल्यालाच बनवायचे असते ते आपोआप होत नसते. चला माझी कॉफी आली …. थांबतो मी.…..!!
                                                     रोहीत पाटील
                                                   9421345159

माझी गॅलरी भाग 8 (हो .... तू आवडतेस मला )



           गेल्या 4-5 दिवसातून आज पावसाने उघडीप दिली होती त्यामुळे आज मी पुन्हा माझी गॅलरी उघडली होती. खुर्ची घेऊन बाहेर  जातोय तोच माझ्या पत्नीने सायलीने माझी कॉफी आणली. कॉफी घेतली आणि तिचा हात हातात धरून तिला म्हणलं तू पण बस आज इथे सामील हो आमच्या मैफिलीत. तिने देखील आनंदाने होकार दिला, आतून आणखी एक खुर्ची घेऊन आली आणि माझ्या शेजारी येऊन बसली. आमची चर्चा सुरू झाली त्यात तिने मला एक प्रश्न विचारला मी तुम्हाला इतकी का आवडते. प्रश्न थोडा गंभीर वाटला. थोडा विचार केला आणि म्हणालो.
            हो... तू आवडतेस मला, म्हणून तर प्रेम करतो तुझ्यावर,तुला पाहायला आलो तेव्हाच आवडलीस तू, मनापासून प्रेम केलं तुझ्यावर म्हणून तर आपलं सगळं जुळून आलं...तू मला का आवडतेस याची कारण अनेक आहेत, खरं तर रोज एक नवे कारण तू देतेस मला तुझ्या प्रेमात नव्याने पडायला...
           तू सुंदर दिसतेस म्हणून आवडतेस मला असं नाही पण मनाने खूपच सुंदर आहेस म्हणून तू आवडतेस. माझ्यावर प्रेम करतेस म्हणूनच नाही पण माझी खूपच काळजी करतेस म्हणून तू आवडतेस मला. तू मला आवडतेस लहान मुलीसारखी वागतेस म्हणून नाही पण खूप maturity दाखवतेस कधी कधी म्हणून...
           तू आवडतेस मला माझ्यावर रुसतेस म्हणून नाही तर मी रुसल्यावर मला मनवायला येतेस म्हणून....तू आवडतेस मला busy असतेस म्हणून नाही पण कितीही busy असलीस तरी माझ्यासाठी वेळ काढतेसच म्हणून… तू आवडतेस मला माझ्याकडे बोलायला काही नाही हे माहिती असते तूला... पन माझ्याशी बोलल्याशिवाय तूला अन मला झोप येत नाही म्हणून… तू आवडतेस मला माझ्याशिवाय राहू शकत नाहीस तू म्हणून नाही तर आपल्या दोघांच्या मनामध्ये असलेल्या अज्ञात अशा कनेक्शन मुळे...
             तू आवडतेस मला माझ्या तूला न आवडणाऱ्या गोष्टीतही आवडीने भाग घेते म्हणून नाही तर त्यात तूला ही आवड आहे हे जाणूनबुजून दाखवतेस म्हणून….
तू आवडतेस मला माझ्याशी खूप भांडतेस म्हणून नाही तर त्यातून माझं प्रेम वाढवतेस म्हणून...
तू आवडतेस मला कारण तूला सगळ जमतं … प्रेयसी बनून प्रेम करणं, आई बनून काळजी करणं, मैत्रीण बनून मला समजून घेणं, एवढंच नाही तर या सगळ्यांपेक्षा सुगरणी सारखा स्वयंपाक करतेस तू म्हणून...
तू आवडतेस मला पहिल्यांदा भेटायला आलीस म्हणून नाही तर माझ्या डोळ्यात डोळे घालून मला i love you बोललीस म्हणून...
              तू आवडतेस मला कारण मी सोबत नसताना रोज माझी आठवण काढतेस म्हणून नाही तर माझ्या विचारात रात्र जागून काढून स्वतःला त्रास करून घेतेस म्हणून….
तू आवडतेस मला आजारी पडतेस म्हणून नाही तर माझ्यासाठी सगळा त्रास सहन करतेस म्हणून...
तू आवडतेस मला प्रेम जपतेस म्हणून नाही तर मैत्रीही तेवढीच करतेस म्हणून...
               तू आवडतेस मला मी लिहितो म्हणून नाही तर आज तू मला का आवडतेस हे एवढं लिहून पण मला अजून अपूर्ण भासतेय म्हणून……..….
              म्हणून तू मला आवडतेस एवढंच…...

माझी गॅलरी .....भाग 7


🖊️🖊️🖊️
*माझी गॅलरी….भाग 7*
   
         आज रविवार त्यामुळे सकाळपासून सगळी कामं रेंगाळतच चालली होती. थोडंफार साफसफाई च काम होतं ते आवरलं आणि आज सकाळीच गॅलरीत बसायची इच्छा झाली. बरेच दिवस झाले गॅलरीत बसायला वेळच मिळत नव्हता. म्हणून आज ठरवलंच होतं. माझी गॅलरी आता नवीन फुलझाडानी सजली होती. थोडी गर्दी वाटत होती. पण तितकंच बरं देखील वाटत होतं. जसा मी दरवाजा उघडून गॅलरीत प्रवेश केला तसा मोगऱ्याच्या फुलांनी त्याच्या सुगंधा समवेत माझे स्वागत केले. थोडं पुढे जाऊन बघावं म्हणलं तर लाल आणि पिवळ्या गुलाबानी त्यांच्या उमललेल्या कळयांसोबत स्मितहास्य करून माझ्या हृदयाला हलकासा सुखद धक्का दिला. त्यांच्या सोबत असलेल्या कृष्णकमळाने त्याच्या जांभळ्या रंगाने मला माझ्या पत्नीच्या बागेतील तो जिवंतपणा दाखवला. इवल्याश्या पांढऱ्या शुभ्र स्वस्तिक ने देखील मनाला आनंद देण्यात कोणतीच कसर सोडली नाही. सर्वांच्या पुढे चाफा आणि रातराणी देखील होत्या त्यांना फुले नव्हती पण त्या त्यांच्या फुलांच्या आठवणीने हिरव्यागार आणि टवटवीत दिसत होत्या. या सगळ्यांचे नेत्रसुख मी घेत असताना अचानक माझी नजर वर ठेवलेल्या मणिप्लान्ट च्या वेलीवर गेली. अस वाटलं की ती वेल जणू एका बाजूला झुकून माझ्याकडेच बघा असे मला खुणावत होती.
          एका बाजूला माझ्या गॅलरीने नवे रूप धारण केले याचा आनंद होत होता पण दुसऱ्या बाजूला माझ्या मैफिलीतल्या माझ्या मित्रांची आठवण देखील माझ्या नजरेला गप्प बसू देत नव्हती सारखी इकडे तिकडे पाहण्यास खुणावत होती. पण त्यातलं कुणीही दिसत नव्हतं. चिमण्यांनी तर आधीच साथ सोडली होती, पण एक दोन मोठ्या पावसानंतर खारुताई ने देखील बहुतेक तिची वाट बदलली होती. मनात थोडं दुःख होतं. पण गॅलरीच नवं रूप बघून नव्याने मैफिल जमवण्याची इच्छा मनामध्ये तयार झालेली होती. सोबत माझ्या लिंबाच्या झाडाची साथ होतीच. काही दिवस झालेल्या पावसाने त्याने देखील त्याचा भूतकाळ विसरून जोमाने बहरण्यास सुरुवात केली होती. थोडा वेळ त्याच्याकडे बघत बसलो असता बरेच पक्षी लिंबावर थोडी विश्रांती घेऊन पुढे जात होते. ते पाहून खूप छान वाटलं…….. चला माझी कॉफी आली…….. आज इथेच थांबतो…….

                                           --   रोहित पाटील
                                             9421345159

जीवन .... एक चकवा


जीवन...एक चकवा..

          आज दोघंही खूपच आनंदात होते…..काहीतरी वेगळं करण्याची खूप इच्छा होती पण त्यांना त्यांच्या मुलांच्या रूटिनमध्ये व्यत्यय आणायचा  नव्हता म्हणून त्यांनी मुलांना-नातवंडांना सरप्राईज द्यायचं ठरवलं.  दोघंही संध्याकाळी घराबाहेर पडले...आता कळवूया का मुलांना?... उतावीळपणानी तिने त्याला विचारले..अन् त्याच्या होकाराची वाट न बघताच मोबाईल काढला..फोन लावला...तिकडून मुलाच्या फोनची रिंग वाजली...तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता..मुलाने फोन घेतला...आणि ती काही बोलण्यापुर्वीच तिकडून मुलानी निरोप दिला.."आई..आज आमचा स्वयंपाक नको करूस हं...हिची मैत्रिण खूप वर्षांनी भारतात आली आहे....तिच्यासोबत आम्ही डिनरला जातोय....मुलंही आमच्यासोबत आंटीला भेटायला येणार ... तेव्हा तुम्ही जेवून घ्या हं...आणि हो औषध - गोळ्या घ्यायला विसरू नका ..बाय"  ...असे म्हणून आई बोलायच्या आधी फोन बंद झाला.. एका क्षणात तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गायब होऊन डोळ्यात पाण्याचे थेंब आले ...काहीही न बोलता तिने फोन ठेवला.. तो किंचीत हसला अन बोलला.."मुलांचा कार्यक्रम ठरलाय ना"..तिने मान हलवली..तो देखील थोडा उदास झाला..म्हणाला.. "आता..? ह्या सरप्राईजचं काय?  ती थोडी सावरली आणि म्हणाली आपलंच सरप्राईज..आपणच एंजॉय करायचं.."
          एव्हाना दोघांचे डोळे भरले होते. थोडा वेळ गेला दोघांनी एकमेकांना सावरलं आणि त्यांनी मुलांसाठी ठेवलेलं सरप्राईज चा कार्यक्रम स्वतः उरकून घेतला…. रात्र झाली 
रात्री मुलाचा व्हॉट्स ऍप वर मॅसेज आला .."आम्ही पोहोचलो...तुम्ही लवकर या.."तिने पोस्ट टाकली.."तुम्ही झोपा.."मुलाने पुन्हा विचारलं.."तुम्ही कुठे,?"आईनी दोघांचा हॉटेलमध्ये अरेंज केलेल्या डिनरचा फोटो टाकला.."त्या" दोघांच्या मागच्या कट-आऊटनी मुलगा आश्चर्याने दणकून उभा राहिला ...त्याने तीला थेट फोन लावला..."आई तुम्ही कोणत्या हॉटेलात आहात..? मी येतोय.."ती शांतपणे म्हणाली.."असू दे बाळा...आम्ही हॉटेल सोडलंय आता..आणि हो..आज आम्ही घरी येणार नाही..लोणावळ्यासाठी निघालोय..तुम्ही शांतपणे झोपा..आणि हो..बाबांच नेहमीचं दरवाजे लावण्याचं काम आजच्या दिवस करून घे हं बेटा..सर्वांना आजच्या विशेष दिवसाचा विशेष आशिर्वाद सांग...बाय.."मुलाने पुन्हा व्हॉट्सऍप उघडला..आणि भरल्या डोळ्यानी त्याने मॅसेज पाहिला..."50th..Wedding Anniversery".....
         त्याने हळूच तिचा हात हातात घेतला.. तिने स्वतःच्या डोळ्यांच्या कडा पुसत त्याला म्हणाली..." जीवन म्हणजे चकवा असतो नाही?...फिरून त्याच जागी आणणारा..? आपल्या आयुष्याची सुरूवात आपण दोघांनीच केली होती ना?... आणि आता आजही आपण दोघंच उरलोय…….…!!

पहिली सुंदर भेट.....


🖊️🖊️🖊️पहिली सुंदर भेट ….

            आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास होता. होय.. आज पहिल्यांदा ती भेटणार होती. त्यात सकाळपासूनच जे ठरवलं ते सगळं घडून येत होतं त्यामुळे उत्सुकता अजून वाढली होती. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी भेट होती. या पहाटेच्या वातावरणात एक अनामिक असा गारवा होता की तिच्या प्रेमाच्या स्वप्नात गुंग होऊन जावं असं वाटत होतं.भरगच्च अशा आभाळाने भरलेलं आकाश, आणि वाऱ्याच्या उबेने नकळत कमी होणारा गारवा घेऊन सम्पूर्ण परिसर अतिशय रम्य वाटत होता. तिथेच सुरुवात झाली माझ्या आजच्या दिवसाची. सगळं आवरून कधी एकदा बाहेर पडतोय असं वाटत होतं. आज कसा आवरलो ते माझं मलाच माहीत आणि मग निघालो . जाताना थोडी मनात धुक धुक होती…. कारणच तसं होतं…. होय तिला आज भेटणार होतो …. घरातून निघून त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत मनामध्ये खूपश्या आठवणी आणि बरेच जुने प्रसंग मनाला छेदून गेले.
             त्या ठिकाणी पोचलो लवकर आलो... की वेळ झाला काही समजेना म्हणून संपुर्ण परिसरात एकदा नजर फिरवली ती कुठे दिसली नाही.  मग लक्षात आलं की ठरलेली वेळ अजून आली नव्हती. मग पुन्हा एकदा स्वप्नाच्या दिशेने वाहत जायला लागलो. पण वेळीच सावरलो आणि ती येणाऱ्या रस्त्याच्या दिशेला नजर लावून उभा राहिलो. लोक येत होते जात होते. काही माझ्याकडे बघत होते मी देखील काही लोकांच्याकडे बघत होतो पण माझ्या मनाची ती चलबिचल अवस्था फक्त मलाच जाणवत होती. ती येणाऱ्या रस्त्याकडे बघत होतो. तोच ती चालत येताना दिसली. पिवळ्या रंगाची साडी नेसून हातामध्ये पर्स घेऊन ....  तिची नजर देखील मलाच शोधत असल्याचं मला स्पष्ट जाणवलं. तिला पाहताच श्रावणात बहरणार्या सृष्टीप्रमाणे माझ्या भोवतालचे वातावरण बद्दलल्यासारखे वाटले. ती सरळ माझ्याकडे आली आणि माझ्या समोर उभी राहिली तिच्या नजरेला माझी नजर भिडली आणि तिच्या डोळ्यांमध्येच मला संपूर्ण सृष्टी दिसायला लागली. आमच्या काही सेकंदाच्या भेटीमध्ये बऱ्याच अव्यक्त भावना विनाशब्द व्यक्त झाल्या, नकळत दोघांच्या चेहऱ्यावर प्रेमाचे हसू उमटले आणि असे वाटले की जणू डोळे उघडून स्वप्नच बघत होतो मी.वाटलं दोन शब्द बोलावं, पण आमच्या नजरा जेव्हा एकमेकांना भिडल्या तेव्हाच आमचं बोलणं संपून गेलं होतं. पुढे काय बोलावे याची गरजच आम्हाला दोघांना वाटत नव्हती. काही वेळ तिथे एकमेकांच्या सोबत घालवावे या विचाराने आम्ही तिथेच फेरफटका मारला दोघांच्याही तोंडून शब्द निघत नव्हते. फक्त एकमेकांच्याकडे बघणं सुरू होतं. या सगळ्यात तासभर वेळ कधी निघून गेला समजलं नाही.
              काही वेळाने तिचा हात हातात घेऊन कधीही साथ न सोडण्याची विनंती केल्यावर जाणवलं की आता वेळ आली होती निरोपाची, नकळत का होईना पण दोघांच्या डोळ्यांमध्ये ओलावा येत होता. इच्छा नव्हती पण …. इलाजही नव्हता. काही क्षणामध्ये अनपेक्षितपणे जे काही घडलं त्यामुळे मनात आलं की खरंच बाप्पा आपल्या पाठीशी नक्कीच आहे. तिथे जाण्याआधी  मनात खूप काही गोष्टी येत होत्या पण तिथे गेल्यानंतर मनाला एका वेगळ्याच वातावरणाने स्पर्श केला होता त्यामुळे मनाला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद झाला जो आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवायला मिळाला........
                                         
                                                       रोहित पाटील
                                                     9421345159

माझी गॅलरी .... भाग 6



        असं म्हणतात की आयुष्यात सुखाएवढेच दुःखाचे देखील दिवस असतात. ते खरं की खोटं माहीत नाही पण आज माझ्यासोबत आणि माझ्या मैफिलीतल्या एका मित्रासोबत जे घडलं ते खरंच खूप वाईट होतं. त्या प्रसंगामुळे त्यांना तर मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं असेलच पण मलाही खूप दुःख झालं. खरं तर एका घरातल्या कर्त्या पुरुषाला वादळात त्याचं घर पडल्यावर जसं दुःख होतं तसंच दुःख त्या चिमण्यांना आज झालं असेल कारण त्यांचं देखील तेच झालं होतं. होय…. त्यांचं घरटं आज उध्वस्त झालं होतं. कालच मी म्हणालो होतो की माझं लिंबाचं झाड किती बहरलंय, पानं किती दाट झालीयत. पण बहुदा माझी नजर लागली की काय कुणास ठाऊक. आज त्या झाडावर कुऱ्हाड पडावी ?…. माझ्यासाठी याच्याइतकी वाईट गोष्ट नव्हती. 

          आज सकाळी शाळेत गेल्यानंतर मलाच काय तर माझ्या घरातील कुणालाच माहीत नसताना MSEB च्या कर्मचाऱ्यांनी माझ्या लिंबाच्या झाडावर कुऱ्हाड मारली होती. त्यातून माझ्या बायकोला त्याची कुणकुण लागताच तीने बाहेर येऊन त्यांना थांबवलं पण तोवर उशीर झाला होता. त्या लोकांनी झाडाच्या वरच्या बाजूच्या सर्व फांद्या तोडल्या होत्या. कारण काय होतं …. तर त्या फांद्या वर असलेल्या विजेच्या तारांना लागत होत्या. पण त्या लोकांना हे दिसलं नाही की त्यांनी तोडलेल्या फांदीवर एक चिमण्यांचं घरटं होतं. कदाचित त्या लोकांच्यावर तसं संकट कधी आलं नसेल जे त्यांनी आज त्या चिमण्यांच्यावर आणलं होतं. आपण एक आपलं दुःख इतरांना सांगू शकतो पण त्या कुणाला काय सांगणार …. त्यांना समजून घेणारं कोण ? …. गॅलरीत बसून आज त्या झाडाकडे बघवत नव्हतं. असं वाटत होतं की ते माझं लिंबाचं झाड नसून कुठलं दुसरंच आहे. 

          या सगळ्याहुन एक वाईट गोष्ट मनात आली ती म्हणजे त्या चिमण्या आता मला पुन्हा भेटतील का ? इतके दिवस त्यांची चिवचिवाट ऐकून माझ्या दिवसाची होणारी सुरुवात आता कशी होईल ? मी ठेवलेले दाणे टिपत असलेले पाहताना माझं पोट भरत होतं. लिंबाच्या झाडावरचा त्यांचा खेळ पाहून उल्हासित होणारं मन आज स्तब्ध उभ्या असलेल्या त्या लिंबाच्या झाडावर खिळून निःशब्द अवस्थेत असल्यासारखं वाटत होतं….आज गॅलरीत आलो खरा पण मैफिलीची आठवण सुद्धा झाली नाही. खरंच आज इथे बसवतच नाहीय …. चार दिवसाच्या सुखाचा प्रवासात हा दुःखाचा थांबा असा काही माझ्या आयुष्यात आला. की त्यामुळे पुढच्या प्रवासाला निघायचं धाडसच होत नाहीय…. चला आज इथेच थांबतो….😢

        

ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए,

​ ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए ,   वरना परिस्थितीयां तो सदैव ही विपरीत होती है … आज डायरी उघडताच ...