माझी गॅलरी.. (भाग 10)
रात्रभर पावसानं थैमान घातलंय. सकाळ झाली तरी थांबायला तयार नव्हता शाळेला सुट्टी होती ते एक बरं होतं. गॅलरीत राहून एक नजर मारली तर सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. काल विचार केला होता की उद्या सुट्टी आहे सकाळी निवांत गावात फेरफटका मारून यायचं पण रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने माझ्या प्लॅनिंग वर पुरते पाणी फिरवले होते. काय करावं सुचत नव्हतं. सहज माझ्या कपाटातला थोडा अनावश्यक कचरा काढावा या हेतूने कपाट उघडले आणि त्यामध्ये माझ्या सगळ्या डायऱ्या अगदी व्यवस्थित ठेवल्या होत्या. त्यांना बघून मी पुन्हा प्लॅन बदलला आणि त्यातली एक डायरी काढली बाहेर येऊन बायकोला कॉफी साठी हाक मारली आणि गॅलरीत येऊन बसलो. 2016 ची डायरी होती ती. बाहेर पाऊस अजून सुरूच होता.
डायरी वाचायला लागलो वाचता वाचता एक पानावर आलो. ते पान होतं सोमवार दिनांक 18 जानेवारी 2016 या दिवसाचं. त्यावेळी माझी बदली भोसे हायस्कुल येथे झाली होती. तो दिवस मला आजही आठवतोय. त्या दिवसानंतर मी सुद्धा बऱ्यापैकी माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला होता. कारण तो प्रसंगच तसा होता
असा एक प्रसंग मी पाहीला की त्यामुळं मन अगदी भरून आलं.काही लोकांची परिस्थिती अशी का असते ? ज्याला सर्व सोयी असतात तोही कशाचा तरी भुकेला असतो. आणि ज्याला कुठल्याही सोयी नसतात तोही भुकेला असतो. कारण आयुष्याची सुरूवात करणारा 2-3 वर्षाचा मुलगा आपल्या वडीलांना मदत करण्यासाठी हातात धरता येत नसताना कोयता उचलतो. हे दृश्य पाहून एक विचार मनात येतो की ,काय त्या 2-3 वर्षाच्या मुलाला कळत असणार आहे की माझ्या वडीलांची परिस्थिती अशी आहे.त्याची 5-6 वर्षाची बहीण वडीलांच्या मागे पाला गोळा करुन पेंडी बांधत होती आणि हे सगळं पहात असतानाच मला माझ्या मुलीची आठवण झाली आणखी थोडा वेळ जर मी त्या ठिकाणी राहिलो असतो डोळ्यांत अश्रू आल्यावाचून राहिले नसतं एवढं नक्की. एखाद्या च्या नशिबी इतकं दारिद्रय येतं आणि ते लोक सुद्धा त्याचा समर्थपणे सामना करण्याचं सामर्थ्य अंगी बाळगून शेकडो किलोमीटर दूर आपल्या कुटुंबासह येतात आणि आपल्या आयुष्याची गणितं जुळविण्याचा प्रयत्न करतात.
अशाच एका कुटुंबाची आज ओळख झाली जे आमच्या शाळेच्या शेजारी असलेला ऊस तोडायला आलेले आहे. त्यांच्या मध्ये एक 2-3 वर्षाचा मुलगा होता. मी थोडा वेळ त्या मुलाकडे बघत राहिलो, पहिल्यांदा तो मला पाहून त्याच्या मोठ्या बहीणीजवळ पळाला. काही वेळाने मी पून्हा तिथे गेलो.मला पाहून तो पून्हा लपायला लागला. मी त्याला बोलवलं आणि चॉकलेट दिलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हास्य आलं ते हास्य कुणाच्या मनात आलं तरी पाहता येणार नाही अस होतं.
पण मी जेव्हा पहिल्यांदा त्या मुलाला बघितलं तेव्हा त्याच्या हातात कोयता होता आणि त्याच्या वडिलांना मदत करण्याचा प्रयत्न करीत होता. तो प्रसंगनेच मला इतका विचार करण्यास प्रवृत्त केलं.
रोहित पाटील
9421345159
खूप छान लिहिलंय सर...
ReplyDelete