म्हातारपणाचं बालपण….
🖊️🖊️🖊️🖊️आज सकाळीच गॅलरीत बसलो होतो. हातामध्ये कॉफी होतीच आणि बाहेर पावसाची रिपरिप सुद्धा सुरूच होती. पण का कुणास ठाऊक आज कशातच मन रमत नव्हते. माझ्या गॅलरीतून हिरवागार निसर्ग पाहून उल्हासित होणारे मन आज शांत होते. समोर टेबलावर एक मासिक पडले होते ते घेऊन चाळू लागलो त्यामध्ये हृदयाला भिडणारा असा एक प्रसंग वाचनात आला. तो प्रसंग असा….
…..एका मोठ्या आलिशान दिवाणखान्यात ऐंशी वर्षाचे वृद्ध वडील सोफ्यावर बसलेले होते, पलीकडे डायनिंगवर त्यांचा चाळीस वर्षाचा मुलगा पेपर वाचत नाष्टा करत होता. तिथेच दहा वर्षाचा नातूदेखील वडिलांसोबत नाश्ता करत होता. इतक्यात खिडकीत एक कावळा येऊन बसतो. वृद्ध वडील आपल्या साधारण चाळीशी पार केलेल्या मुलाला विचारतात, "तो कोणता पक्षी आहे ?" मुलगा चकित होतो, की वडिलांना इतके पण माहीत नाही ? की माझी फिरकी घेताहेत ?? पण जाऊ द्या, असे म्हणत मुलगा शांतपणे उत्तर देतो, "बाबा, तो कावळा आहे" दोन मिनिटे जातात. तो कावळा "काव काव" ओरडतो. यावर वृद्ध वडील पुन्हा मुलाला विचारतात, "तो कोणता पक्षी आहे ?" आता थोडा वैतागून मुलगा म्हणतो, "अहो! तो कावळा आहे" पाच मिनिटे जातात. पुन्हा वडील मुलाला विचारतात, "तो कोणता पक्षी आहे ?" आता हातातला पेपर बाजूला करून, मुलगा चिडून म्हणतो, "कितीदा सांगू तुम्हाला ? की तो कावळा आहे म्हणून? यावर पुन्हा दोन चार मिनिटे गेल्यावर पुन्हा वडील मुलाला विचारतात, "तो कोणता पक्षी आहे ?"
यावर मात्र मुलाचा संयम संपतो. तो हातातला पेपर ताड्कन खाली फेकून वडिलांना जोरात म्हणतो, "चार वेळा तुम्ही विचारलंय आणि मी सांगितलंय तुम्हाला की तो कावळा आहे. आता मला पेपर वाचू देणार आहात की नाही ? की उठून जाऊ इथून बाहेर ?"
वृद्ध वडील हळूच उठतात आणि आतल्या त्यांच्या खोलीत जाऊन खुर्चीवर बसतात. समोर... ते नेहमी लिहीत असलेली रोजची डायरी असते. त्यातले एक पान काढून वाचत असतानाच त्यांचा लाडका नातू हळूच तिथे येतो. आजोबाच्या मागून तोही डायरी वाचू लागतो. आणि अचानक पुढे होऊन ती डायरी उचलून तो पळत बाहेरच्या खोलीत वडिलांकडे येतो. त्या डायरीतील "ते" पान वडिलांसमोर धरतो. वडील वाचू लागतात....
"सकाळी पेपर वाचत असताना एक छान प्रसंग माझ्यासोबत घडला. आज माझा 6 वर्षाचा मुलगा मांडीवर येऊन बसला. समोरच्या झाडावर एक कावळा येऊन काव काव करू लागला. मुलाने मला तब्बल चोवीस वेळा विचारले की ते काय आहे ? कोणता पक्षी आहे ? आणि मीही हातातला पेपर बाजूला करून ठीक चोवीस वेळा त्याला उत्तर दिले. आणि प्रत्येक वेळी मी त्याला उत्तर दिल्यावर जवळ घेऊन पापा देत गेलो. आणि तो खुश होत गेला. यात आमचा अर्धा तास खूप छान गेला.
हे वाचून नकळत त्या चाळिशीतल्या मुलाचे डोळे पाणावले आणि ते अश्रू डायरीच्या पानावर ओघळू लागले. त्याचबरोबर डायरीतील पुढची अक्षरे डोळ्यातल्या अश्रूंमुळे धूसर होत गेली. तो ताडकन उठला आणि आत जाऊन बाबांच्या मिठीत विसावला.
वृद्धपण म्हणजे जणू दुसरे बालपण असते. म्हणून आपण ज्यांच्यामुळे घडलो, मोठे झालो, त्या आई-वडिलांना त्यांच्या वृद्धपणी "लहान" समजून वागवनं ही आताची गरज आहे. नात्यात जीवन जन्मते आणि जीवनात नाती फुलतात. म्हणून या नात्याला आपल्याला जपायचंय !!
हा प्रसंग वाचून झाल्यानंतर मला समजलं की माझे देखील डोळे काहीसे ओलावले होते. आणि मन भरून आलं होतं.……….
रोहित पाटील
9421345159
No comments:
Post a Comment