असं म्हणतात की आयुष्यात सुखाएवढेच दुःखाचे देखील दिवस असतात. ते खरं की खोटं माहीत नाही पण आज माझ्यासोबत आणि माझ्या मैफिलीतल्या एका मित्रासोबत जे घडलं ते खरंच खूप वाईट होतं. त्या प्रसंगामुळे त्यांना तर मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं असेलच पण मलाही खूप दुःख झालं. खरं तर एका घरातल्या कर्त्या पुरुषाला वादळात त्याचं घर पडल्यावर जसं दुःख होतं तसंच दुःख त्या चिमण्यांना आज झालं असेल कारण त्यांचं देखील तेच झालं होतं. होय…. त्यांचं घरटं आज उध्वस्त झालं होतं. कालच मी म्हणालो होतो की माझं लिंबाचं झाड किती बहरलंय, पानं किती दाट झालीयत. पण बहुदा माझी नजर लागली की काय कुणास ठाऊक. आज त्या झाडावर कुऱ्हाड पडावी ?…. माझ्यासाठी याच्याइतकी वाईट गोष्ट नव्हती.
आज सकाळी शाळेत गेल्यानंतर मलाच काय तर माझ्या घरातील कुणालाच माहीत नसताना MSEB च्या कर्मचाऱ्यांनी माझ्या लिंबाच्या झाडावर कुऱ्हाड मारली होती. त्यातून माझ्या बायकोला त्याची कुणकुण लागताच तीने बाहेर येऊन त्यांना थांबवलं पण तोवर उशीर झाला होता. त्या लोकांनी झाडाच्या वरच्या बाजूच्या सर्व फांद्या तोडल्या होत्या. कारण काय होतं …. तर त्या फांद्या वर असलेल्या विजेच्या तारांना लागत होत्या. पण त्या लोकांना हे दिसलं नाही की त्यांनी तोडलेल्या फांदीवर एक चिमण्यांचं घरटं होतं. कदाचित त्या लोकांच्यावर तसं संकट कधी आलं नसेल जे त्यांनी आज त्या चिमण्यांच्यावर आणलं होतं. आपण एक आपलं दुःख इतरांना सांगू शकतो पण त्या कुणाला काय सांगणार …. त्यांना समजून घेणारं कोण ? …. गॅलरीत बसून आज त्या झाडाकडे बघवत नव्हतं. असं वाटत होतं की ते माझं लिंबाचं झाड नसून कुठलं दुसरंच आहे.
या सगळ्याहुन एक वाईट गोष्ट मनात आली ती म्हणजे त्या चिमण्या आता मला पुन्हा भेटतील का ? इतके दिवस त्यांची चिवचिवाट ऐकून माझ्या दिवसाची होणारी सुरुवात आता कशी होईल ? मी ठेवलेले दाणे टिपत असलेले पाहताना माझं पोट भरत होतं. लिंबाच्या झाडावरचा त्यांचा खेळ पाहून उल्हासित होणारं मन आज स्तब्ध उभ्या असलेल्या त्या लिंबाच्या झाडावर खिळून निःशब्द अवस्थेत असल्यासारखं वाटत होतं….आज गॅलरीत आलो खरा पण मैफिलीची आठवण सुद्धा झाली नाही. खरंच आज इथे बसवतच नाहीय …. चार दिवसाच्या सुखाचा प्रवासात हा दुःखाचा थांबा असा काही माझ्या आयुष्यात आला. की त्यामुळे पुढच्या प्रवासाला निघायचं धाडसच होत नाहीय…. चला आज इथेच थांबतो….😢
😢
ReplyDelete