माझी गॅलरी .....भाग 7


🖊️🖊️🖊️
*माझी गॅलरी….भाग 7*
   
         आज रविवार त्यामुळे सकाळपासून सगळी कामं रेंगाळतच चालली होती. थोडंफार साफसफाई च काम होतं ते आवरलं आणि आज सकाळीच गॅलरीत बसायची इच्छा झाली. बरेच दिवस झाले गॅलरीत बसायला वेळच मिळत नव्हता. म्हणून आज ठरवलंच होतं. माझी गॅलरी आता नवीन फुलझाडानी सजली होती. थोडी गर्दी वाटत होती. पण तितकंच बरं देखील वाटत होतं. जसा मी दरवाजा उघडून गॅलरीत प्रवेश केला तसा मोगऱ्याच्या फुलांनी त्याच्या सुगंधा समवेत माझे स्वागत केले. थोडं पुढे जाऊन बघावं म्हणलं तर लाल आणि पिवळ्या गुलाबानी त्यांच्या उमललेल्या कळयांसोबत स्मितहास्य करून माझ्या हृदयाला हलकासा सुखद धक्का दिला. त्यांच्या सोबत असलेल्या कृष्णकमळाने त्याच्या जांभळ्या रंगाने मला माझ्या पत्नीच्या बागेतील तो जिवंतपणा दाखवला. इवल्याश्या पांढऱ्या शुभ्र स्वस्तिक ने देखील मनाला आनंद देण्यात कोणतीच कसर सोडली नाही. सर्वांच्या पुढे चाफा आणि रातराणी देखील होत्या त्यांना फुले नव्हती पण त्या त्यांच्या फुलांच्या आठवणीने हिरव्यागार आणि टवटवीत दिसत होत्या. या सगळ्यांचे नेत्रसुख मी घेत असताना अचानक माझी नजर वर ठेवलेल्या मणिप्लान्ट च्या वेलीवर गेली. अस वाटलं की ती वेल जणू एका बाजूला झुकून माझ्याकडेच बघा असे मला खुणावत होती.
          एका बाजूला माझ्या गॅलरीने नवे रूप धारण केले याचा आनंद होत होता पण दुसऱ्या बाजूला माझ्या मैफिलीतल्या माझ्या मित्रांची आठवण देखील माझ्या नजरेला गप्प बसू देत नव्हती सारखी इकडे तिकडे पाहण्यास खुणावत होती. पण त्यातलं कुणीही दिसत नव्हतं. चिमण्यांनी तर आधीच साथ सोडली होती, पण एक दोन मोठ्या पावसानंतर खारुताई ने देखील बहुतेक तिची वाट बदलली होती. मनात थोडं दुःख होतं. पण गॅलरीच नवं रूप बघून नव्याने मैफिल जमवण्याची इच्छा मनामध्ये तयार झालेली होती. सोबत माझ्या लिंबाच्या झाडाची साथ होतीच. काही दिवस झालेल्या पावसाने त्याने देखील त्याचा भूतकाळ विसरून जोमाने बहरण्यास सुरुवात केली होती. थोडा वेळ त्याच्याकडे बघत बसलो असता बरेच पक्षी लिंबावर थोडी विश्रांती घेऊन पुढे जात होते. ते पाहून खूप छान वाटलं…….. चला माझी कॉफी आली…….. आज इथेच थांबतो…….

                                           --   रोहित पाटील
                                             9421345159

No comments:

Post a Comment

ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए,

​ ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए ,   वरना परिस्थितीयां तो सदैव ही विपरीत होती है … आज डायरी उघडताच ...