🖊️🖊️आज पून्हा एकदा मनातल्या भावनांना वाट करून द्यावसं वाटलं.रोजच्या जीवनातील सुख आणि दुःख यांचा मेळ घालता घालता कधी आयुष्याची वळणे मागे टाकून आपण पुढे जातो कळतच नाही.लहान असताना आयुष्य कसं जगायचं हे माहित नसतं आणि जेव्हा हे कळतं तेव्हा स्वतःसाठी जगायला वेळ नसतो.त्यातून ही एखादा स्वतःसाठी जगायला बघतो तर तेव्हा त्याला समाजाची लक्ष्मणरेषा ठळक दिसायला लागते.तो तिथेच थांबतो आणि आपल्या पदरी पडलेल्या आयुष्यात सुख आणि आनंद शोधायला लागतो आणि बघता बघता आयुष्याची कोरी वही तो भराभर भरायला लागतो.असाच एक प्रसंग आज अनुभवायला मिळाला आणि माझ्या मनाला एक वेगळाच स्पर्श करून गेला.
काल आमच्या मित्राचे वडील देवाघरी गेले तेव्हा स्मशान भूमीत गेलो होतो.पुढची व्यवस्था पहावी म्हणून आम्ही दोघे - तिघे सगळ्यांच्या थोडं अगोदर तिथे पोहोचलो सर्व व्यवस्था झाली होती.शेजारी एका झाडाजवळ असलेल्या कट्ट्यावर आम्ही बसलो.शासनाच्या निर्बंधामुळे नेहमी प्रमाणे गर्दी नव्हती. एक वेगळीच शांतता काल तिथे अनुभवली.शेजारून वाहणाऱ्या कृष्णामाईच्या बंधाऱ्यातून पडणाऱ्या पाण्याचा आवाज कधी कधी ती शांतता भंग करते की काय असं वाटत होतं.स्मशाणातील कर्मचारी स्वछता करत होते त्यांच्या खराट्याचा आवाज एकसारखा एका सुरात येत होता आणखी एक कर्मचारी तेथील लाकडे रचण्याचं काम करत होता. आम्ही येण्याआधी एक प्रेत त्या ठिकाणी जळत होतं त्याचा देखील आगीचा आवाज स्पष्ट ऐकायला येत होता.काही ठिकाणी जाळून गेल्यानंतर त्याची राख तिथे पडलेली दिसत होती.तर काही ठिकाणी रक्षा विसर्जन होऊन तिथे नैवेद्य ठेऊन लोक निघून गेले होते.हे सगळं डोळ्यात भरून घेत असताना साधारण 60 ते 65 वयाचा एक माणूस तिथे आला.मळकट फाटके कपडे, वाढलेले केस,दाढी,पायाने अनवाणी असा एक गरीबी आणि लाचारी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसणारा असा माणूस, तो जळून गेलेल्या राखेत काहीतरी शोधायला लागला.मी एकटक त्याच्याकडे बघत होतो. मी त्याच्याकडे बघतोय हे त्याच्या लक्षात आल्यानंतर तो तिथून बाजूला झाला.तो त्या प्रेत जळालेल्या राखेत काय शोधत असेल असा विचार मनामध्ये आला.तोवर तो माणूस तिथून जाऊन रक्षा विसर्जन झालेल्या ठिकाणी गेला तेथील नैवेद्य उचलले आणि त्याकडे पाहत त्यातील एक पदार्थ तोंडात टाकला आणि राहिलेलं त्याच्या जवळच्या कापडात बांधून तो नदीच्या पात्राकडे निघून गेला. माझ्या जवळ असलेल्या एकाने मला म्हणले की हा माणूस रोज इथे असतो.आणि हे त्याचं रोजचं ठरलेलं काम आहे. हे ऐकून मन खिन्न झाल. तेवढ्यात आमचे लोक आले,सगळं आटोपल्यावर मी नदीच्या दिशेला जाऊन पाहिलं,म्हटलं त्याला भेटावं आणि थोडी विचारपूस करावी तोवर तो तिथून देखील निघून गेला होता. मनामध्ये त्याची छबी अगदी स्पष्ट कोरलेली होती.काहीश्या प्रमाणात काळजाला छेदून गेलेला हा प्रसंग मनामध्ये घोळत स्मशानातुन बाहेर पडलो.........
It reminded me of a chapter in my 8th Std. SMASHANTLA SONA.
ReplyDeleteIt reminded me of a chapter in my 8th Std. SMASHANTLA SONA.
ReplyDelete