आठवणींची मिसळ….
कुठेतरी जाऊन शांत एकांतात बसावं वाटलं. बसल्या बसल्या समोर दिसणाऱ्या मावळत्या सूर्याकडे नजर गेली. दिवसभराचा क्षीण मागे ठेऊन संध्याकाळचा रम्य देखावा समोर ठेऊन तो नजरेआड होत होता. त्याच्याकडे बघून मनात आलं की या वाढत्या वयाबरोबर आपण देखील बऱ्याच गोष्टी मागे सोडून आलो. आजही त्या आठवल्या तर कधी ओठावर हलकसं हसू तर येतं किंवा डोळ्यांमध्ये पाणी तर येतं. खरंच आहे जुन्या आठवणी असतातच तश्या. या आठवणी आपल्या सध्याच्या मरगळलेल्या जीवनाच्या जखमेवर मलमाचा लेप लावून येतात आणि नकळत आपण आनंदाच्या लहरींमध्ये मिसळून जातो. थोडा वेळ का होईना पण बरं वाटतं.
मला आठवतं लहानपणी आपण कापसाची म्हातारी पकडण्याचा खूप प्रयत्न करायचो कधी सापडायची तर कधी बघता बघता गायब व्हायची. आज असे वाटते त्या कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला बालपणीचा सुखाचा काळ स्वतःबरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या म्हातारीने तिचं वार्धक्य जणू आपल्यालाच दिलय आणि त्याचमुळे ती अजून उडू शकते आणि आपण जमिनीवरच आहोत असं वाटतंय.
या आठवणींच्या लहरींमध्ये असंच आणखी मागे गेलो आणि आठवले ते शाळा बुडविलेले दिवस घरातून शाळेसाठी निघायचं आणि मित्रांसोबत कुणाच्यातरी तरी शेतात जाऊन दिवसभर त्या शेतात खाण्याजोगं काहीही असुदे त्यावर डल्ला मारायचा .. घरातून एखाद्या दिवशी मिळालेला रुपया घेऊन दुकान जायचं त्याचे चॉकलेट घ्यायचे आणि ते चॉकलेट खिशात ठेऊन पळत जाताना ते पडू नयेत म्हणून घरात पोहोचेपर्यंत खिशातून हात काढायचा नाही ….. लहानपणी आमच्या पायात चप्पल कधी होती असं आठवतच नाही तरी देखील आमच्या पायाला चिखल कधी लागलेला आठवत नाही….आमचा हा देखील आनंद फारकाळ टिकण्यातला नव्हता.
खरंच असे काही किस्से आठवले तर मनाला एक अनामिक हुरहूर लागते. आणि आठवणींच्या या आगगाडीचे डबे एकामागून एक समोर यायला लागतात. ज्यामध्ये बसून पुन्हा एकदा बालपणात जावंसं वाटतं….. आज एकेकदा असं वाटतं की का आलं आपल्याला हे शहाणपण … हरवून सुंदर बालपण …...
रोहित पाटील
9421345159
No comments:
Post a Comment