जगाचं वास्तव...




जगाचं वास्तव….

         आज दुपारी शाळा सुटल्यानंतर म्हटलं गणपतीचं दर्शन घेऊन यावं. आणि शाळेतून घरी न जाता थेट गणपती मंदिराकडे गाडी वळवली. लॉकडाऊन मुळे मंदिर बंद च होतं बाहेरून च दर्शन घेतलं. म्हटलं 10 मिनिटं बसावं इथं. बाहेरच असलेल्या कट्ट्यावर बसलो. एकटाच होतो बोलायला कुणी नव्हतं. मोबाईल काढला आणि आलेले कॉल्स आणि मॅसेज बघत बसलो. थोडा वेळ असाच निघून गेला. आणि आता निघणार एवढ्यात एक म्हातारी बाई माझ्यासमोर येऊन तिच्या हातातली काठी मी बसलेल्या पायरीवर फिरवू लागली आणि तिथे काही नाही हे पक्कं झाल्यावर खांद्यावर अडकवलेलं गाठोडं खाली ठेऊन त्या पायरीवर बसली. तिची सगळी कृती बघून माझ्या लक्षात आले की बहुतेक त्या आज्जीला डोळ्याला दिसत नसणार

         मी आजीला हाक मारली.. माझा आवाज ऐकून तिने तोंड माझ्याकडे फिरवून मला म्हणाली 'काय झालं बाबा' मी म्हणालो काही नाही... इथे का बसलात. तेव्हा ती म्हणाली माझी रोजची जागा आहे ही दुपारच्या जेवणाची. ती माझ्यासोबत बोलत होती पण तिची नजर माझ्याकडे नव्हती ते बघून मला नक्की झालं की आजीच्या डोळ्यांना दिसत नाही. मी आजीला विचारलं 'डोळ्यांना दिसत नाही का?' तेव्हा आजी म्हणाली 'नाय रं बाबा आंधळी हाय मी' …. मी म्हणालो कधीपासून दिसत नाही. आजी म्हणाली 'लहानपणापासून'. 'मग दवाखान्यात दाखवलं नाही का' मी विचारले. तेव्हा आज्जी सांगू लागली..'आरं दवाखान्यात दाखवलं न्हाई म्हणून तर अशी हुन बसल्या मी... लहान असताना डोळ्यात दुखत होतं म्हणून माझ्या बा नं मला कुठल्या बुवाकडं नेलं त्यानं माझ्या डोळ्यात कुणास म्हाईत कसलं तेल घातलं. त्यावेळी डोळ्यात चर्रर्रकण चरचरलं आन  आज पातूर डोळ्याला दिसत पण न्हाई अन तिथं काय जाणवत पण न्हाई.. त्या बुवा न काय घातलं म्हाइत न्हाई थोडं दिसत व्हतं ते पण बंद झालं…हे ऐकून मला धक्का बसला. मी पुढे तिला विचारलं तुम्ही एकटेच आहात का. त्यावेळी ती उत्तरली 'व्हय बाबा आता एकटीच हाय… चार दिसा पैलच मालक मेला माझा .. सोडून गेला मला आता एकटीच हाय मी'. हे ऐकून अक्षरशः मला नकळत मी पायरीवरून उभा राहिलो.पुढे काही विचारायचं धाडस च झालं नाही मला. 

          हे सगळं ऐकून माझ्या संपूर्ण अंगावर शहारे आले. ती आता बोलायचं थांबली होती. तिने आणलेल्या भाकरी कडे माझं लक्ष गेलं. पापड तुटावं तसा आवाज त्या भाकरीचा आवाज येत होता. ते बघून मला राहवलं नाही मी तिथून निघायच्या प्रयत्नात लागलो तेवढ्यात तिला खाताना ठसका लागला तिच्याजवळ पाणी नव्हते. मी माझी पाण्याची बाटली तिच्या हात दिली एक घोट पिऊन ती पुन्हा मला द्यायला लागली मी तिला म्हणालो 'असू द्या तुमच्याकडे'. हातात होती तेवढी भाकरी तिने संपवली. बहुदा एक पूर्ण भाकरी सुद्धा नव्हती ती. मी जवळच्या गाड्यावरून दोन वडापाव घेतले तिला दिले. 

           मी गाडीला किक मारून गाडी घराच्या मार्गाला वळवली पण तीनं सांगितलेला हा प्रकार ऐकून तिच्या आयुष्याच्या काही छटा माझ्यासमोर लगेच उभ्या राहिल्या. आज तीचं वय साधारण 70 इतकं वाटत होतं.संपुर्ण आयुष्य कसं काढलं असेल तिनं. खरं तर हेच वास्तव आहे आजच्या जगाचं. आपण आपलं नोकरी आणि घर एव्हढंच बघतो पण त्याच्या बाहेरच जग आणि त्या जगाचं वास्तव मला आज बघायला मिळालं. 


                                          रोहित पाटील 

                                        9421345159

No comments:

Post a Comment

ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए,

​ ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए ,   वरना परिस्थितीयां तो सदैव ही विपरीत होती है … आज डायरी उघडताच ...