चार क्षणांचं हे म्हातारपण
थोडं आपण संभाळवून घ्यावं ।
निघून जातील आजोबा तेव्हा
अश्रू मध्ये त्याना जपून ठेवावं ।
प्रत्येकाच्या आयुष्यात असं एक पात्र असतं की ते घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुठल्या ना कुठल्या तरी भूमिकेत असते ती व्यक्ती म्हणजे ...आजोबा . घरातल्या लहानग्यांना तर आजोबांची प्रत्येक भूमिका आवडीची असते. मग ते खांद्यावरून फिरवून आणायचं असेल किंवा त्यांच्या प्रत्येक खेळात भाग घेणं असेल. घरातील प्रत्येक व्यक्ती आजोबांना घाबरत असते कारण घरातील ज्येष्ठ या नात्याने ते प्रत्येकाला समज देऊ शकतात पण आपल्या नातवाला मात्र कधीही काही म्हणत नाहीत कारण या नात्यामध्ये भावनेचा एक असा वलय तयार झालेला असतो त्यामध्ये आजोबा देखील त्यांच्या नातवाच्या वयात गेलेले असतात.
आज मला माझ्या एका आजोबांची आठवण झाली. शेतामध्ये पानमळ्यातल्या लाकडांनी तयार केलेल्या भिंतीच्या झोपडी मध्ये ते त्यांच्या कुटुंबासह राहत होते. त्याना दोन मुले आणि एक मुलगी होती. आमच्या शेताजवळ त्यांची शेती असल्यामुळे आणि आमच्या आजोबांच्या आणि त्यांच्या मैत्रीमुळे आमच्यात एक वेगळ्याच प्रकारचं कौटुंबिक नातं होतं. माझ्यासह माझी सर्व भावंडे जवळ जवळ त्यांच्याच खांद्यावर फिरून मोठी झाली. त्यांची मुले माझ्या पेक्षा मोठी असल्यामुळे ते माझ्या भावंडांसोबत खेळायला असायची. मला आठवतंय त्यांच्या झोपडीमध्ये आम्ही तासनतास खेळायचो तिथेच जवळ असलेल्या चिंचेच्या झाडाखाली दुपारचं झोपून देखील जायचो. आणि आम्ही तिथे असायचो म्हणून आजोबा देखील आमच्या जवळून हालायचे नाहीत.
आजोबांचं आणि आमचं एक वेगळंच नातं तयार झालं होतं. आम्हाला त्यांचं नाव घेता येत नव्हतं म्हणून आम्ही त्यांना 'मळ्यातले आज्जा' असे म्हणायचो. कारण ते मळ्यात रहायचे. काही दिवसानंतर ते गावात राहायला आले तरी आमच्यासाठी ते माळ्यातले आज्जाच होते. आज बऱ्याच वर्षानंतर देखील गावी गेल्यानंतर आम्ही भावंडं त्यांच्या घरी गेल्याशिवाय राहात नाही. आजही त्यांच्या घरी चुलीवरच स्वयंपाक होतो.आम्ही गेलो की त्यांच्या घरातील लोखंडी ट्रंकेत ठेवलेल्या कप बश्या काढून विनादुधाचा चहा आम्हाला आमच्या घरच्या चहा पेक्षा गोड लागतो. आज्जीच्या हातचे पोहे आज देखील आठवलं की त्याची चव तोंडात येऊन गेल्यासारखं होतं. या सगळ्याला कारण होतं त्यांची आमच्या प्रती असलेली माया आणि आमच्या मनामध्ये त्यांच्या प्रती असलेली आपुलकी. या दोन गोष्टीवरच आमच्यामधलं नातं आजवर टिकून राहीलं आहे. त्यांचं शिक्षण किती झालं होतं माहीत नाही. झालं होतं की नाही हे देखील माहीत नाही पण आम्हाला त्यांच्या प्रेमानं आणि मायेनं आम्हाला अशी काही शिकवण दिली की त्याचा आम्हाला आज पुरेपूर उपयोग होताना जाणवतंय. आज देखील त्यांची आठवण आली की चेहऱ्यावर एक समाधानानं आलेलं हास्य आपोआप येतं.
आज बरेच दिवस झाले त्यांना भेटून काही दिवसांपूर्वी चौकशी केली असता समजलं की ते सध्या गावात नसतात त्यांच्या मुलीकडे असतात. माझ्या आयुष्याच्या पुस्तकात सोनेरी अक्षरात कोरलेल्या नावांमध्ये माझ्या या आजोबांचं आणि आज्जींच नाव ठळक पणे असेल हे मला माहित आहे. पण माझ्या भावंडांच्या आयुष्यात देखील त्यांचं एक वेगळं स्थान असेल हे नक्की……..
रोहित पाटील
9421345159
खुप छान आजोंबांचा जवळचा हा नातु असतो व नातवाची सर्वात पहिली मैत्री अजोबां बरोबर आसते
ReplyDelete