🖊️🖊️🖊आज मन थोडं उदास आहे. कारणच आहे तसं. जाता जाता आज शाळेतल्या घंटेकडे लक्ष्य गेले. आणि मनामध्ये विचारांचे वादळ भिरभिरायला लागले. एव्हाना शाळेच्या व्हरांड्यात आणि मैदानात मनसोक्त बागडणारी मुलं आज तिथुन गायब होती. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस काय असतो हे आज ही आपण विसरू शकलो नाही, ते देखील दिवस आजच्या मुलांच्या नशिबी असू नयेत? जीवनाच्या सुंदर इमारतीची पायाभरणी करण्याच्या या काळापासून मुले वंचित राहत आहेत हे दृश्य खूपच विदारक वाटतंय. मुलांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने आकार देणाऱ्या या शाळा आज अश्या शांत आणि निःशब्द अवस्थेत आहेत असं वाटतंय. आयुष्याच्या या अद्भुत काळाचा ठेवा मनामध्ये कोरून ठेवण्याऐवजी मुलं आज मोबाईल मध्ये गुरफटलेली दिसतायत. पहिल्यांदा शाळेची पायरी चढण्यासाठी आतुर असलेली मुलं आज मोबाईलवर शाळा अनुभवत आहेत. हे सगळं बघून खूप दुःख होतंय.
खरंच वाईट वाटतंय, वाईट वाटतंय या गोष्टीचं की आजकालच्या या मुलांना ते दिवस अनुभवता येणार नाहीत की जे शाळेच्या त्या पहिल्या दिवसाची तयारी तीन चार दिवस आधीपासूनच सुरू झालेली असायची. नवीन युनिफॉर्म, नव्या कोऱ्या वह्या, नवी पुस्तकं, नवीन दप्तर, वह्यांच्या कागदांचा तो वास आणि त्या नव्या पुस्तकांच्या काळजीपाई त्या पुस्तकांना आपल्या आजोबांच्या मागे लागून समोर बसून जुन्या वर्तमानपत्राचे कव्हर घालून घेणं. आजही हे आठवलं तरी मला माझ्या बालपणात गेल्यासारखं वाटतं. मला आठवतंय नवीन युनिफॉर्म घेण्यासाठी शाळा सुरू व्हायच्या आधी तीन चार दिवसांपासून बाबांच्या मागे लागायचं.आणि नवीन आणलेल्या वही आणि पुस्तकांवर आजोबांच्याकडूनच नाव घालून घ्यायचो आणि पहिल्या दिवशी शाळेत जाऊन सगळ्यांना दाखवायचो यात जो आनंद मिळत होता तो आजपर्यंत कधीच विसरलो नाही.
आज या महामारी मुळे कित्येक मुलांचं बालपण एक वेगळ्याच दिशेने जाताना दिसतंय जे त्यांच्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. आजच्या युगाची ती गरज आहे मान्य आहे पण त्याच्यामुळे मुलं आपल्या मातीची किंमत विसरायला लागलेत हे ही तितकेच खरं आहे.
👏🏻
ReplyDelete