माझी गॅलरी ...भाग 5

 

      


 🖊️🖊️🖊️ आज बऱ्याच दिवसांनी तब्येत पुन्हा पहिल्यासारखी वाटतेय म्हटलं आज थोडा वेळ गॅलरीत जाऊन बसावं . साधारण पावणे सहा वाजले असतील सूर्य मावळतीला चालला होता. दिवसभर रानावनात भटकून चरून आलेली जनावरे घाईघाईने घरी परतत असलेली दिसत होती. गेल्या  2-3 दिवसापासून पावसानेही पाठ फिरवली आहे. समोर च्या मैदानावर मुले क्रिकेट खेळत होती पावसाने उघडीप दिली याच्याइतकी आनंदाची गोष्ट त्या मुलांसाठी कुठली नव्हती आणि हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट भासत होते. समोरच्या लिंबाचे झाड आणखीनच बहरलेले पाहून खूप छान वाटले.त्यावर असलेल्या माझ्या मैफिलीतल्या चिमण्यांचे घरटे आणखीनच मजबूत दिसत होते.पण बराच वेळ बघत होतो, दिवस मावळायची वेळ झाली तरी चिमण्या अजून घरट्याकडे परतलेल्या नव्हत्या. आजवर असं कधी झालं नव्हतं मी जेव्हा आठवण काढेन थोड्या वेळाने का होईना त्यांचं दर्शन व्हायचं पण आज तसं झालं नाही. तब्येत ठीक नव्हती त्यामुळे कॉफी देखील नव्हती. डॉक्टरनी पिऊ नका असं सांगितलं होतं. काहीच मनासारखं नव्हतं. मी गॅलरीत होतो पण मन कुठेतरी इतरत्र फिरतंय असंच वाटत होतं. 

            जसा सूर्य मावळतीच्या दिशेने जात होता तसा माझा जीव कासावीस होत होता. अजून माझ्या मैफिलीत कुणीच सामील झाले नव्हते. कुठून तरी चिमण्यांचा आवाज यायचा पण बघू बघू पर्यंत तो आवाज गायब व्हायचा. अचानक वाऱ्याची मोठी झुळूक आली आणि माझ्या डायरीची  पाने फडफड करायला लागली. त्याला सावरत असताना माझी नजर खारुताई कडे गेली. खुप दिवसांनी मी त्यांना बघितलं. आज ती एकटी नव्हती तीच्या बरोबर आणखी एक होती. दोघांचा खेळ चालला होता.  माझ्या हातात डायरी आणि पेन होता पण त्या दोन खारुताई च माझ्या मनाच्या पटलावर त्यांचं लिखाण करत होत्या. त्यांची घाई, त्यांची लगबग पाहून माझ्या मनामध्ये पुन्हा एक आनंदाची लहर तयार झाली. त्यांची छबी मोबाईल मध्ये टिपून घ्यावं म्हणलं पण जवळ जवळ अंधार झाला होता. आज बऱ्याच दिवसांनी काहीतरी सुखद बघायला मिळालं होतं. पण त्याच बरोबर माझ्या चिमण्यांची देखील आठवण येत होती. बघू उद्या तरी त्या मला भेटतात का ?


No comments:

Post a Comment

ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए,

​ ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए ,   वरना परिस्थितीयां तो सदैव ही विपरीत होती है … आज डायरी उघडताच ...