माझी गॅलरी…..भाग 4
आज वातावरण खूपच मस्त होतं. पाऊस पडून गेलेला होता. सर्वत्र हवेत कमालीचा गारवा होता. नुकताच दुपारची वामकुक्षी घेऊन मी गॅलरीत आलो होतो त्यामुळे थोडा आळस अंगामध्ये जाणवत होता. पण काही वेळातच त्या आल्हाददायी वातावरणाशी एकरूप झालो आणि शरीरासह मनाने देखील फ्रेश झालो. समोर दिसणारा हिरवागार निसर्ग डोळ्यात भरून घेत होतो मंद वाहणाऱ्या वाऱ्यामुळे लिंबाच्या झाडाची इवलीशी पाने थंडीने गारठून थरथरत असल्यासारखे वाटत होते. पाऊस नव्हता पण आभाळ गच्च भरलेले होते. पावसाने काही काळासाठीच विश्रांती घेतली आहे असे स्पष्ट जाणवत होते.तेवढ्यात मला कॉफीची आठवण झाली. आणि त्यासाठी बायकोला हाक मारली आता माझी कॉफी येईपर्यंत म्हणलं माझे सवंगडी दिसतात का पहावं. तर ते समोरच झाडावर बागडत होते. त्यांच्याकडे पाहत होतो तोवर चिमण्यांसाठी ठेवलेल्या दाण्याच्या प्लेट मध्ये काहीतरी आवाज येतोय असं वाटलं. हळूच तिथे जाऊन पाहिलं तर आज चिमण्यांच्या ऐवजी तिथे एक खारुताई दाणे खात होती. मी लगेच मोबाईल काढून त्याचा फोटो घेतला. त्याच्याकडे थोडा वेळ बघत राहिलो. आज पहिल्यांदा प्रत्यक्ष डोळ्याने आणि इतक्या जवळने खारुताईला खाताना बघितलं अगदी पुढच्या दोन पायासारख्या हातामध्ये दाणे घेऊन तोंडात घालत होतं. हे सगळं बघत असताना बायको ने हाक मारली त्या आवाजाने ती खारूताई बघू बघू पर्यंत गायब झाली. बायकोकडे थोडा रागाने बघितलं पण तिच्या हातातली कॉफी बघून राग कुठच्या कुठे निघून गेला. तिच्या हातातून कप घेतला आणि तिला त्या खारुताई बद्दल सांगितले. तिच्यामुळे खारुताई निघून गेल्याचे तिला पण दुःख झाले. थोडा वेळ आम्ही गप्पा मारल्या तेवढ्यात पुन्हा तिथून आवाज आला. ती खारुताई पुन्हा तिथे येऊन दाणे खात होती. आम्ही दोघांनी कोणताही आवाज न करता ते दृश्य टिपून घेतली. थोड्या वेळाने ती तिथून निघून गेली. रोज कॉफी मुळे मिळणारा आनंद आज त्या खरुताईच्या येण्याने मिळाला होता. तिच्या लगबगीला पाहताना असे वाटले आज आमच्या मैफिलीत आणखी एका सदस्याची भर झाली. बघू हा नवीन सदस्य आमच्या मध्ये किती दिवस राहतो ?
रोहित पाटील
9421345159
No comments:
Post a Comment