माझी गॅलरी.... भाग 1


माझी गॅलरी…..(1)

   🖊️🖊️🖊️कालपासून आभाळ दाटत होतं. पावसाळ्याच्या सुरुवातीची चाहूल लागत होती. ढगाळ वातावरण, थंडगार वारा आणि बायकोनी तयार करून दिलेली कॉफी हे त्रिकुट आज माझ्या मनावर स्वार झालेले होते. कॉफीचा एक एक घोट अगदी चवीनं प्यावसं वाटत होतं. वातावरणच तसं होतं. दाटलेल्या आभाळाकडे बघत तो कधी बरसतो आणि सुंदर आनंदमय परिसर मी माझ्या डोळ्यामध्ये सामावून घेतोय असं वाटत होतं. तेव्हा माझ्या मनात एक विचार आला की, मी एवढ्या आतुरतेने वाट बघतोय तर त्या नयनरम्य पिसारा फुलवून मोहून टाकणारे मोर, आणि पावसाच्या एका थेंबाची वाट पाहणारा चातक यांची काय अवस्था झाली असेल.  

             माझ्या घराच्या गॅलरीत बसून माझ्या मनामध्ये या विचारांची मैफिल रंगली होती. एक जातोय तोवर दुसरा विचार मनात येत होता. ही माझ्या मनाची अवस्था समोरच्या लिंबाच्या झाडावरच्या घरट्यात राहणाऱ्या चिमण्यांना जाणवली की काय कुणास ठाऊक. त्या दोन- तीन चिमण्या गॅलरीच्या एका बाजूला अगदी माझ्यासमोर येऊन बसल्या. त्यांचा चिवचिवाट ऐकून ते ही माझ्याशी गप्पा मारतायत असे मला भासले. मी एकटक त्यांच्याकडे पाहू लागलो. तेवढ्यात एक थंडगार वाऱ्याची झुळूक आली आणि पत्र्यावर टप्प् टप्प्  असा आवाज यायला लागला. हातातल्या कप मधील उरलेली कॉफी एका घोटेत संपवली आणि गॅलरीत उभा राहिलो. चिमण्यांना देखील पावसाची चाहूल लागली असेल ते ही त्यांच्या घरट्या जवळ निघून गेली. आणि बघता बघता धो-धो पाऊस सुरू झाला काही क्षणात संपूर्ण सृष्टी त्यात न्हाऊन निघाली. आणि माझ्या डोळ्याचे पारणे फिटले…...

                                  --- रोहित पाटील (9421345159)

No comments:

Post a Comment

ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए,

​ ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए ,   वरना परिस्थितीयां तो सदैव ही विपरीत होती है … आज डायरी उघडताच ...