🖊️🖊️🖊️🖊️🖊️
*धुक्यातली शाळा....*
आज शनिवार नेहमी प्रमाणे सकाळची शाळा , लवकर उठून गॅलरीमध्ये जातोय तोच एक अद्भुत नजारा आज पाहायला मिळाला. रोज समोर दिसणारी झाडे, सकाळचा तो निर्जन रस्ता त्या रस्त्यावरील खांबावर लावलेले ते दिवे आज दिसेनासे झाले होते. कारण आज त्यांना धुक्यानी स्वतःमध्ये सामावून घेतलं होतं. त्यानंतर मनात तयार झालेल्या धुक्यातून फिरण्याच्या उत्कंठेपोटी लगबगीने आवरून गाडी घेऊन बाहेर पडलो. आजच्या या वातावरणाला बघून मी माझी नेहमीची वाट थोडी बदलून लांबचा रस्ता धरला मोबाईल वरच्या खिशात ठेवला आणि रस्त्यावरून येताना निसर्गाच्या त्या अद्भुत सौंदर्याचा एक आणि एक क्षण मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपत नेहमी पेक्षा कासवाच्या गतीने शाळेत पोहचलो. येता येता वाटेवरचा तो नजारा पाहून एक छान चारोळी लक्षात आली
*धुक्यातून मला दिसेना रस्ता*
*थबकली या वाटेवर पावले* ।
*इतक्यात सैरभैर सांभाळणारे*
*काही वाटेकरू मला घावले* ।।
शाळेत पोहोचल्यानंतर धुक्यातली शाळा पाहून पहाटेच्या थंडीसोबत पसरलेल्या धुक्याने एक अनामिक गारवा अंगाला झोम्बला आणि क्षणात अंगावर शहारे आले ..... शाळेची नव्याने झालेली रंग रंगोटी आज त्या धुक्यामध्ये उठून दिसत होती. असं वाटलं माझ्या शाळेचा तो नवा थाट पाहण्यासाठी जणू मेघ च आज या पृथ्वीतळावर उतरलेत. शाळेच्या मैदानाकडे पाहिलं आणि असं वाटलं जणू या हिवाळ्याच्या थंडीत धुक्याची चादर पांघरून घेतलीय या मैदानानं. सभोवताली डौलात उभ्या असलेल्या हिरव्यागार झाडांनी देखील आज आपली हिरवळ जणू बाजूलाच ठेवलीय असं वाटत होतं. त्या झाडांच्या पानावरुन तयार होऊन जमिनीवर पडणाऱ्या दवबिंदूंचा आवाज स्पष्ट कानावर येत होता. हात लावू त्या वस्तूवर दवबिंदू साठलेले होते. पाखरे देखील आज दव थेंब पिऊन एका वेगळ्याच उत्साहानं किलबिलाट करत होते. माझ्यासोबत विद्यार्थी देखील त्या धुक्याचा आनंद लुटत होते. मैदानातील खेळाच्या साहित्यावर तयार झालेले दवबिंदू काही मुले हाताच्या चिमटीत पकडण्याच्या प्रयत्नात ते देखील या सृष्टीशी एकरूप होत होते आणि जर एखादा थेंब हातात आलाच तर तो मित्राच्या अंगावर झाडायचा, काहीजण लहान झाडांना हलवून त्यावरून पडणाऱ्या थेंबांचा मनमुराद आनंद लुटत होते. असा त्यांचा कार्यक्रम चालला होता. मुलांना सोडायला आलेले पालक देखील आज सेल्फी घ्यायच्या मोहतून सुटत नव्हते . ज्याच्या त्याच्या तोंडी फक्त धुक्याचाच विषय होता.
अख्खं गाव आज धुक्याच्या लपेटीत बघून मनाला एक वेगळाच गारवा मिळाला होता. जो माझ्या डायरीत सोनेरी अक्षरांनी कोरून ठेवण्यासारखा होता.