🖊️🖊️🖊️🖊️
आठवण.....
बरेचदा असं होतं की मनात बोलायचं खूप असतं पण त्यासाठी शब्दच सापडत नाहीत. बऱ्याच वेळा आपण काहीतरी पाहतो किंवा ऐकतो त्यावेळी मनात एक प्रकारचं वादळ तयार होतं. पण काही वेळानं पेल्यातलं वादळ जसं पेल्यातच शमतं तसं आपल्या मनातलं वादळ देखील मनातच शमतं…. काहीवेळा बरेच क्षण मनामध्ये येतात आणि तिथेच थांबून राहतात पण आज माझ्या डायरीमुळे आणि माझ्या ब्लॉगमुळे माझं आणि त्या क्षणांचं एक सुंदर नातं जडलंय जे मी शब्दांच्या रूपाने एक एक फुल गुंफून गजरा माळावा तसा शब्दांचा गजरा मी माळायचा प्रयत्न करतोय.
'आठवण' हा शब्दच हल्ली खूप आवडता झालाय. कुठेही ऎकायला येउदे किंवा वाचायला येउदे लगेच मनामध्ये एक वेगळया प्रकारचं विश्व बनायला सुरुवात होते. आणि त्या विश्वात आपण कधी भरकटुन जातो कळत नाही. आज शाळेत बसलो असता असंच काहीसं घडलं माझ्यासोबत, आणि त्या आठवणींच्या विश्वात आभाळातून पडणाऱ्या पावसाच्या सरींप्रमाणे एकामागून एक प्रसंग डोळ्यांसमोर येऊ लागले. आणि पुन्हा मला माझ्या डायरीच्या सोनेरी पानांकडे घेऊन गेले.
शाळेत बसलो होतो समोर मैदानावर मुले खेळत होती. हर-तर्हेचे खेळ मला दिसत होते. त्यांच्याकडे बघत असताना मला माझ्या शाळेची आठवण झाली. माझी गावातील शाळा ….. जुन्या पध्दतीने बांधलेली कौलारू इमारत आज देखील माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांवर केलेल्या संस्कारांची आणि उपकारांची जाणीव करून देत डौलात उभी आहे. तिथल्या बोलक्या भिंती आणि खांबावरचे पाढे कदाचितच कोणीतरी विसरलं असेल. बसायला बेंच नव्हते पण फरशीवर बसायला देखील तितकीच मजा यायची. आम्हाला हवी ती जागा पकडायला आम्ही शाळेचं कुलूप काढायलाच शाळेत असायचो. पण आठवत नाही की कधी पहिली जागा पकडली आम्ही. शाळेतली ती आमची गॅंग सकाळी एकदा एकत्र आलो की संध्याकाळी घरी जातानाच वेगळी व्हायची. लहानपण ही माणसाला मिळालेली एक दैवी देणगीच आहे, जी प्रत्येक व्यक्तीच्या स्मरणात कायमची मुरलेली असते. खरंच आहे लहान असताना आईच्या हाताची मिळालेली उशी आणि त्यातला जिव्हाळा मोठेपणी शोधून देखील सापडणार नाही. आत्ताच्या ब्लॅंकेट पेक्षा जास्त ऊब असलेली ती आईची कुशी……कशाची तरी भीती दाखवून खायला घातलेला तो पालेभाजीचा घास…. घरात न सांगता घेऊन खाल्लेले म्हातारीचे केस…..शाळेत बडबडगीते म्हणताना लावलेला सूर…... वर्गात पाढे म्हणताना अचानक काढलेला मोठा आवाज आणि दिवसभरात मनाला पडलेले प्रश्न रात्री झोपताना आजोबांना विचारून त्यांनी दिलेल्या उत्तरांचा विचार करत झोपी जाणं…..ह्या गोष्टी आज सुद्धा मनाला वेड लावणारे आहेत, आणि मनात आणणारे आहेत की पुन्हा आपल्याला बालपणात जाता येईल का ?
हा आयुष्यातला खरा सोनेरी काळ प्रत्येकाच्या जीवनाच्या डायरीत सोनेरी अक्षरांनी कोरून ठेवलेला असतो. आणि हे जेव्हा आठवेल तेव्हा नकळत चेहऱ्यावर हसू येत असतं हे नक्की……..🙏
खूप छान शब्दांकन
ReplyDeleteThank you...
Delete