🖋️🖋️🖋️🖋️
माझं पुस्तक
‘पुस्तक’ .... मग ते शाळेतलं असो वा आयुष्याचं .... मनापासून गोडी लावली की त्याचा लळा लागतोच. आणि त्यानंतर ते वाचणं असो वा जगणं दोन्ही सोपं होऊन जातं. बर्याचदा लोकांचं असं होतं कि ही पुस्तकं पूर्ण समजावून घेण्याआधीच ती निम्म्यावर सोडून मोकळे होतात. पण अशा लोकांच्या हे लक्षात येत नाही कि जसं आपण पुढे वाचत जाऊ,किंवा जगत जाऊ तसे त्याची उत्सुकता वाढत जाते.
खरंतर शाळेपेक्षा आयुष्याच्या पुस्तकातूनच आपण खूप काही शिकत असतो या पुस्तकातलं प्रत्येक पान आपल्याला काहीतरी नवीन दाखवत असतं, शिकवत असतं. या पुस्तकात सुरुवातीची काही पानं अशी असतात की जणू क्षितिजावर असणार्या सूर्याला सलामी देण्यासाठी अख्खं आभाळ जसे लाल-केशरी रंग परिधान करतो तसे आपलं बालपण अनुभवण्यासाठी आपलं कुटुंब करतं. तो काळ असा असतो कि सर्व काही आपल्यासाठीच असतं. त्यातला बराच काळ आपल्यासाठी अविस्मरणीय असतो.
त्यानंतर धडा येतो तो आपलं व्यक्तिमत्व तयार करण्याचा आणि त्याला योग्य आकार देण्याचा शाळेमधले, कॉलेजमधले ते दिवस असे असतात कि जणू आयुष्याने या पुस्तकात ठळक अक्षराने ते कोरून ठेवलेले असतात. आणि का बर असू नये ? ..... कारण त्या दिवसाना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळी जागा असते. त्यावेळी आपल्या व्यक्तिमत्वाची मूर्ती घडवत असताना आपल्या आई-वडिलांनी, आपल्या शिक्षकांनी जे घाव आपल्यावर घातलेले असतात ते संपूर्ण आयुष्यभर आपल्या लक्षात राहतात आणि तोच काय तो बऱ्याच जणांच्या आयुष्यातला पहिला टर्निंग पॉईंट ठरतो.
आता मात्र यानंतर चा काळ म्हणजे आयुष्याच्या पुस्तकात आलेली एक सुंदर कविता असते. जवळ जवळ शिक्षण पूर्ण होऊन आपण नोकरीला किंवा कामधंद्याला लागलेलो असतो. आणि त्यावेळी भावनेच्या ओळीमध्ये रेखाटलेली, सुखाच्या रंगांनी आणि दुःखाच्या वेदनांनी गुंफलेल्या या कवितेच्या प्रत्येक ओळीवर जबाबदारीची एक झालर ओढलेली दिसून येते. या जबाबदारीच्या वेलीवर कष्टाने झिजलेली पाने आणि मनासारखं फुलण्यासाठी काट्यातून काढला जाणारा मार्ग याच गोष्टी खऱ्या अर्थाने आपल्याला जगायला शिकवितात.
पुस्तकाच्या शेवटी येणाऱ्या पानांचा अनुभव मी तर अजून घेतला नाही पण बऱ्याच जणांकडे पाहून एवढं मात्र लक्षात आलं कि शेवटची काही पानं अशी असतात की त्यातून आपल्याला काही केल्या बाहेर पडता येत नाही. आयुष्यभर आपण हे पुस्तक जसे हाताळतो तसेच धडे ते आयुष्याच्या शेवटी आपल्याला दाखवत असतं. पण त्यामध्ये एक गोष्ट मात्र सत्य आहे कि या आयुष्याच्या पुस्तकात असे असंख्य क्षण आपल्यासमोर येतात ज्यांचे रहस्य कधीच उलगडले जात नाही. आणि आपणही कधी तसा प्रयत्न करत नाही. ......... धन्यवाद
रोहित पाटील
9421345159