दिसामाजी काहीतरी लिहावं....🖊️🖊️

*दिसामाजी काहीतरी लिहावं.....*          

          रोज काहीतरी छान लिहावं असं खुप वाटतं. कारण असं म्हणतात की दिसामाजी काहीतरी लिहावं. मी हे बऱ्याचदा ऐकले आहे. मला लिहायला खूप आवडतं कारण त्यावेळी मी व्यक्त होत असतो, स्वतःशीच का होईना पण मनापासून आणि मनमोकळेपणाने बोलत असतो,  त्यावेळच्या बोलण्याला कशाची भीती नसते वा कुठलीही बंधने नसतात. पण रोजच्या रोज असे मनाच्या सागरातुन विचारांचे मोती बाहेर काढणं हे देखील वाटते तितके सोपे नाही. जीवनाच्या वाटेवर अनेक प्रसंग आपल्यासमोर येतात की त्यांचा आपल्या जीवनावर बराच प्रभाव पडत असतो. ते प्रसंग काही वाईट असतात तर काही चांगले देखील असतात.ते सर्व प्रसंग आपण आपल्या लेखनीद्वारे कागदावर उतरवले पाहिजे असे मला वाटते. आपलं व्यक्तिमत्व सुधारण्याची व आदर्श बनवण्याची एक उत्तम संधी आपल्याला त्याद्वारे मिळत असते.
              खरं तर रोज डायरी लिहिली पाहिजे या गोष्टीचा मी खूप आग्रही आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांनाही  नेहमी सांगतो. विद्यार्थांनाच नव्हे तर माझ्या मित्र परिवरामध्ये देखील सांगण्याचा प्रयत्न करत असतो. लेखनाचे महत्व किती आहे. आजपर्यंत आपल्याला अनेक साहित्यिकाच्या कार्यातून दिसूनही आले आहे. 
               डायरी लिहिल्यामुळे आपल्यातील गुण दोष काय आहेत हे आपल्याला समजते त्याची पडताळणी आपल्याला करता येते आयुष्यातल्या महत्वाच्या किंवा अविस्मरणीय गोष्टी आपल्याला डायरित उतरवुन जपून ठेवता येतात अणि कधीतरी काढून त्या गोष्टी वाचत बसलो कि त्या आठवणींच्या ओलाव्यात कधी आपण चिंब भिजून जातो आपल्याला कळत नाही. आणि चेहऱ्यावर एक वेगळच स्मितहास्य उमटतं. ते वाचत असताना मनाला जो आनंद मिळतो तो काही औरच असतो. खरं तर मलाही खूप उशिरा या गोष्टीच महत्व समजल. पण जेव्हा समजल तेव्हा पासून माझ्या आयुष्यातली एक आणि एक अविस्मरणीय गोष्ट मी लिहून ठेवली आहे. आज त्या उघडून वाचायला लागलं कि कधी तास दोन तास निघून जातात कळत नाही. शिवाय मनाला मिळणार सुख ते वेगळच. म्हणून माझी नेहमी सगळ्यांना सांगनं असतं कि दिवसातून निदान चार वाक्य तरी स्वतःबद्दल लिहाव. आपल्यात काय  बदल होतो हे मी सांगण्यापेक्षा ज्याला त्यालाच नक्की कळेल.

                              रोहित पाटील
                            9421345159

वासुदेव आला हो…..



वासुदेव आला हो…..


         वासुदेव आला हो .....वासुदेव आला .....सकाळ च्या पारी हरिनाम बोला.....हो वासुदेव आला....

आजची सकाळ या ओळी कानावर घेतच झाली. पहिल्यांदा वाटलं रेडिओ वर गाणं लागलं असेल पण थांबून थांबून तो आवाज यायला लागला मग मात्र पक्कं झालं की खरंच आज घरासमोर वासुदेव आला होता. लगबगीने उठून गॅलरीत जाऊन बघितलं अजून लांब होता. वाऱ्याच्या वेगानं आवरून लगेच खाली गेलो अजून ही तो आमच्या घरासमोर आला नव्हता. थोडा वेळ थांबलो का कुणास ठाऊक पण त्याला भेटायची प्रचंड इच्छा होत होती. आणि मग एकदाचा तो माझ्या समोर येऊन उभा राहिला. दोन्ही पाय जुळवून हात कमरेवर ठेवले आणि त्या सकाळच्या प्रहरी साक्षात विठुरायाचं दर्शन त्यानं मला घडवलं.अंगभरून पांढरा सदरा, त्यावर लाल सोनेरी पट्टीने स्वस्तिक चा आकार,  हातात टाळ-चिपळ्या,  कपाळी विठू माऊलीसारखा गंध, गळ्यात विविध देवांच्या माळा, कमरेला बासरी, डोक्‍यात लाल रंगी आणि त्याला सोनेरी कडा असलेली निरनिराळ्या माळांनी गुंफलेला मोरपिसाचा टोप, आणि त्या टोपीवर विठ्ठल रखुमाई च्या लहानशा मूर्त्या आशा काही ठेवलेल्या होत्या की समोरचा बघताच क्षणी हात जोडल्याशिवाय राहणार नाही.  असं मनाला हवंहवंसं वाटणारं देखणं मी रूप डोळे भरून न्याहाळत होतो. थोडा वेळ थांबून त्यानेच पुन्हा विठ्ठलाचं गुणगान गायला सुरुवात केली.

         गाणं संपवून प्रसन्न आणि हसऱ्या चेहऱ्याने त्याने त्याची कला दाखवायला सुरुवात केली. आणि माझ्या सोबत उभ्या असलेल्या लहानग्या पुतण्याकडे पाहून त्याच गोड कौतुक त्याच्या सुरेल वाणीने केलं. त्याचं सगळं झाल्यानंतर मी थोडी विचारपूस करण्याच्या हेतूने त्याच्याशी चार गोष्टी बोललो तेव्हा त्याने सांगितलं की बारामती तालुक्यातुन आलेला हा अवलिया पोटाची खळगी भरायला गावोगावी फिरतो असं सांगितलं. पूर्वी सारख लोकं आता आम्हाला जास्त महत्व देत नाहीत असं त्याच्या बोलण्यातून जाणवलं . आणि खरंच आहे पूर्वी गावात वासुदेव आलाय म्हणलं तर अख्खं गाव हातातलं काम सोडून त्याच्याशी चार गोष्टी बोलायचं, आणि घरातलं जे काही धान्य असायचं त्यातलं सुप भरून धान्य त्याला द्यायचं , खूप मानमरातब मिळायचा त्यांना पण आजची परिस्थिती वाईट झालीय त्याने घरात येऊन हाक मारली तरीही घरातुन कोण बाहेर येत नाहीत. त्याच्या हातातील टाळ-चिपळ्या चा ताल कानाला एक वेगळ्याच प्रकारचं समाधान देऊन जायचा...ज्यामुळे संपूर्ण दिवस आनंदात आणि समाधानाने पार पडायचा. जाता जाता मी आणि त्याने दोघांनी एकमेकांना हात जोडला आणि त्याने पुढची वाट धरली. आषाढी एकादशी जवळ आलीय माझ्या शाळेच्या वाटेवर अनेक वाऱ्या पंढरीला जाताना दिसतायत पण मला आज माझ्या घरीच साक्षात  विठुमाऊलीनं दर्शन दिल्याचं जाणवलं आणि माझ्या दिवसाची सुरुवात एका संस्मरणीय घटनेनं झाली  या समाधानानं मी पुढच्या कामाला लागलो. खरं तर आजची सकाळ अशी होईल ही अजिबात अपेक्षा नव्हती. चला 

....जय हरी विठ्ठल....🙏🙏

                                           --  रोहित पाटील

                                             9421345159

ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए,

​ ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए ,   वरना परिस्थितीयां तो सदैव ही विपरीत होती है … आज डायरी उघडताच ...