आठवणींची शिदोरी.....


🖊️🖊️🖊️🖊️🖊️

आठवणींची शिदोरी...


      " मैं जिंदगी का साथ निभाता चला गया , हर फिक्र को धुएं मे उडाता चला गया….." आज खूप दिवसांनी हे गाणं ऐकलं. अगदी शांत डोळे मिटून एकदा ,दोनदा नाही तर तब्बल तीनदा पुन्हा पुन्हा ऐकलं …गाणं ऐकता कधी त्या आठवणींच्या खिडकीपाशी गेलो आणि त्या खिडकीतून येणाऱ्या अविस्मरणीय क्षणांची थंडगार झुळूक मनाला गारवा देऊन गेली कळलंच नाही…… 

         सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यात आंब्याचा सिझन…तुम्हाला सांगतो माझं गाव पूर्वी आंब्यासाठी खूप प्रसिद्ध असायचं पूर्वी म्हणे घरटी 4-5 तरी आंब्याची झाडे असायचीच गोटी आंबा म्हणायचो त्याला कारण त्याचा आकार तसाच होता. सुट्टी लागली की आमचा एकच कार्यक्रम असायचा सकाळी लवकर उठायचं आणि रानात जाऊन आंब्यांची राखण करायची कारण पांदीला रान होतं आमचं त्यामुळे वर्दळ जरा जास्तच होती. आणि आंबे तर असे असायचे की झाडाला लटकलेले बघूनच तोंडाला पाणी सुटायचं….. मग काय  जाता - येता कोण दगड मारणार नाही तो आळशी….. अस समीकरण झालं होतं. त्यामुळे सकाळी आम्ही घरातील मुलं लवकर उठून रानात यायचो नंतर जेवण करून आजोबा यायचे आणि आमची सुट्टी व्हायची ….. तिथून पुढे पोहण्याचा कार्यक्रम असायचा गावात एकच बांधीव विहीर होती त्या एका विहिरीत आख्ख गाव पोहायला यायचं नंतर नंतर तर अशी परिस्थिती झाली की पोहताना हात फिरवला की कुणाला तरी लागणारच…..  एवढी गर्दी व्हायला लागली. हे सगळं बघून एकदा विहिरीच्या मालकांनी विहीर पोहण्यासाठी बंद करून टाकली. 

            संध्याकाळी कट्ट्यावर ज्या गप्पा रंगायच्या त्याच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर शब्द अपुरे पडतील …. आमच्या दोस्तांना शाळेच्या पेपर मध्ये दोन अंकी गुण मिळतील की नाही माहीत नव्हतं पण कट्ट्यावर गावातल्या एखाद्याच्या भावकितला तिढा आमच्याच चर्चेत अगदी लीलया सोडवायचे. रात्री झोपायला आम्ही गच्चीवर असायचो. कधी मामा म्हणल्या जाणाऱ्या चंद्राला बघून डोळा लागायचा तर कधी लांब पसरलेले तारे मोजत स्वप्नात रमून जायचो. 

         खरंच …. तो लहानपणीचा सोनेरी काळ ते गावातील सुंदर, स्वच्छ वातावरण ….. दिवसभर दम न घेता खेळलं फिरलं हुंदडल कंटाळा यायचा नाही आणि आलाच तर संध्याकाळी सहा वाजले की आमच्या गावच्या मारुतीच्या देवळात स्पिकर लागायचे त्यावर मस्त भक्तीगीत किंवा भजनं लावली जायची त्यामुळे अख्ख्या गावातलं वातावरण रोज भक्तिमय आणि चैतन्यमय होऊन जायचं …. त्यावेळी त्या भक्ती गीतांचा भजनांचा अर्थ जरी समजत नसला तरी ते ऐकून दिवसातील किती तरी वेळा आमच्या तोंडून ते गुणगुणलं जायचं. त्यामुळे ते दिवस सर्वांच्याच आयुष्यातले अविस्मरणीय दिवस होते.

          ही सगळी आठवणींची शिदोरी घेऊन आम्ही कधी या धावत्या युगात आलो कळलंच नाही. आणि गाव देखील या युगात पार बदलून  गेलंय. आजही गावातल्या झाडांना आंबे लागतात पण त्याला दगड मारायला कुणाला वेळच नाही. विहिरीत पोहणे ही संकल्पनाच जणू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आज मी माझ्या मुलीला घेऊन स्विमिंग पूल मध्ये जातो खरा पण तिथल्या पोहोण्यातल्या मजेची सर इथे येत नाही…गावात आजही मंदिरावर स्पीकर लागतो पण तो ऐकायला कुणालाच सवड नाही…. आवडीचा तर विषयच नाही. राना-वनात भटकायचं तर डोक्यावर टोपी असून सुद्धा आपल्याला ऊन लागतं. मुळात चालत फिरणे म्हणजे आता मोठं कष्टाचं काम झालंय. 

            एका गोष्टीचं वाईट वाटतंय की त्यावेळी डायरी लिहायची सवय नव्हती नाहीतर ही शिदोरी आज  जगायला एक वेगळी दिशा दाखवताना खूप मोलाची ठरली असती हे नक्की ….. 


                                        रोहित पाटील 

                                      9421345159

         

ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए,

​ ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए ,   वरना परिस्थितीयां तो सदैव ही विपरीत होती है … आज डायरी उघडताच ...