सोनेरी पानं...


🖊️🖊️🖊️🖊

सोनेरी पानं…

        आयुष्याच्या वाटचालीत आपल्याला ठीक ठिकाणी असे अनेक क्षण येतात की ते आपल्यासाठी अविस्मरणीय ठरतात. शाळेच्या वहीत जाळी झालेले पिंपळाच पान जपून ठेवावे तसे काही क्षण आयुष्याच्या ह्रदयरूपी वहीत कायमचे कोरलेले असतात. आपल्या नकळत हे क्षण अलगदपणे मनाच्या एका कोपऱ्यात विसावतात आणि मग तयार होतो एक नाजूकसा "आठवणींचा धागा"...असे क्षण माझ्या डायरीत मी सोनेरी अक्षरात लिहून ठेवलेत. खरं तर अशी अनेक पानं माझ्या डायरीत दिसतात. म्हटलं आज त्याबद्दल काहीतरी लिहावं….

         माझ्या डायरीतील सर्वात पहिले सोनेरी पान कुठले असेल तर ते म्हणजे मला डी.एड. ला मिळालेला प्रवेश. नशीब काय असतंय हे माझ्याइतकं कदाचित कुणाला माहीत नसेल. कारण त्याची प्रचिती मला माझ्या आयुष्यात पाऊलो-पाऊली आली.

          तर ........'सावर्डे'....... कोकण नावाच्या स्वर्गातील एक शिक्षण पंढरी….. कै. गोविंदराव निकम साहेब नावाच्या विठ्ठलरुपी व्यक्तिमत्वाच्या संकल्पनेतून ही पंढरी उभी राहिली. आणि माझ्यासारख्या असंख्य माऊलिंना या पंढरीने जगण्याची दिशा दाखवली. याच सावर्डेत मला डी.एड. ला प्रवेश मिळाला हे देखील मी माझे नशीबच समजतो. या डी. एड. ने आणि सावर्डे ने माझ्या मनामध्ये इतके आठवणींचे अमृत पेरले की ते आज देखील माझ्या आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात. 

          मित्रांनो मला डी.एड. ला प्रवेश मिळाला तो महिना होता जानेवारी 2006. खरं तर त्यावेळी डी.एड. चे कॉलेजेस चालू व्हायचे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये. पण माझा प्रवेश निश्चित झाला जानेवारी मध्ये तो देखील एक नशिबाचाच भाग होता असं म्हणायला काही हरकत नाही. पुढे तोच प्रवेश माझ्या आयुष्याचं एक महत्वाचं वळण ठरेल असं वाटलं नव्हतं. 

           डी.एड. हे एक कारण होतं खरं तर मी जगायलाच शिकलो तिथे. जिवाभावाचे मित्र, एकमेकांसाठी काहीही करण्यासाठी तयार असणारे,...... आमची रूम….. फक्त भाडे भरायलाच ती आमची पाच जणांची होती पण रोज कमीत कमी 10जण तरी झोपायला तिथे असायचे पण त्यांचा राग कधी आला नाही. कारण कधी आम्ही देखील त्यांच्या रूम वर असायचो….. फिरायला आम्हाला कधी दिवस कळला नाही आणि कधी रात्र….फाट्यावरचा चहा…..चहा पिऊन झाल्यावर माझ्या खात्यावर लिहून ठेव म्हणून सांगणं  ... रात्री 12 वाजता हायवे च्या कट्ट्यावर बसणं खूप छान वाटायचं तिथं बसून वेळ कसा जायचा कळायचं नाही कारण त्यावेळी विषय देखील तसे मस्त असायचे जो तो मनातलं बोलत असायचा….हे सगळं करत असताना कधी ही कुणाला घरची आठवण येत नसायची कारण आम्ही सगळे घरच्यांपेक्षा जवळचे होतो. 

           खरंय गेलेले दिवस पुन्हा कधी येऊ शकत नाहीत आणि मनात आणलं तरी आपण तसं जगू शकत नाही. आयुष्यातला प्रत्येक क्षण मनापासून जगला पाहिजे आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे हे म्हणतात ते काय खोटं नाही…🙏

                                              रोहित पाटील

                                             9421345159

ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए,

​ ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए ,   वरना परिस्थितीयां तो सदैव ही विपरीत होती है … आज डायरी उघडताच ...