*अवघड गोष्ट....*
🖊️🖊️🖊️🖊️आजची संध्याकाळ खरंच डोळ्यात साठवुन ठेवण्यासारखी होती. बऱ्याच दिवसांनी असं निवांत बसण्याची संधी मिळाली. सोबत तीही होती. हळू हळू आमच्या गप्पा रंगत चालल्या होत्या. एकामागून एक येत असलेल्या वैचारिक मतांच्या लाटा आम्हा दोघांना घेऊन खोल अशा भावनेच्या समुद्रात जात होत्या. बऱ्याच दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर दिसणारी आनंदाची ती चमक बघतच रहावं असं वाटत होतं. हा क्षण माझ्यासाठी खूप सुखद होता.
गप्पा मारताना तिने सहजच मला एक गंभीर प्रश्न विचारला ....या जगातली सर्वात अवघड गोष्ट कोणती ? मी थोडा वेळ शांत बसलो आणि विचार केला ... हिला असा प्रश्न का बरं पडला असेल? थोडा विचार करून मी तिला म्हणालो.... मला असं असं वाटतं की या जगातील सर्वात अवघड गोष्ट म्हणजे आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तींच्या मुखवट्या मागील त्याची ओळख समजणे . कारण आजच्या युगात एखादी व्यक्ती जर कुणासोबत जिव्हाळ्याने वागत असेल तर ती व्यक्ती खरंच तशी आहे की त्यामागे काही स्वार्थ आहे हे ओळखने खूप कठीण आहे...... माझं उत्तर ऐकून तिचा चेहरा पडला ... मी म्हटलं काय झालं. ....तेव्हा ती म्हणाली.... मला तुमच्याकडून वेगळं उत्तर अपेक्षित होतं . मी म्हणालो वेगळं म्हणजे काय... तेव्हा तिला थोडा राग आलाय हे माझ्या लक्षात आलं . मी समजावून तिला म्हणालो ....अगं सांग तर तुला काय अपेक्षीत होतं... तेव्हा ती काहीच न बोलता तिथुन उठून गेली. मला काहीच समजलं नाही ती अशी का उठून गेली...... झालं आमच्या त्या सुखद संध्याकाळ चा पुरता निकाल लागला होता..... नंतर येणारी रात्र ही काळरात्र ठरते की काय असं वाटायला लागलं. मी विचार करू लागलो. नक्की काय अपेक्षित असेल बरं हिला. विचार करता करता बराच वेळ निघून गेला. सभोवतालच्या परिसरात किर्रर्रर्र अंधार पसरला . बऱ्याच विचारांती मला समजलं की या जगात सर्वात अवघड गोष्ट जर कुठली असेल तर ..... बायकोच्या मनात नक्की काय असतंय हे ओळखणे...
आणि पुन्हा लक्षात आलं की असा प्रसंग माझ्या आयुष्यात याआधी ही कित्येकदा येऊन गेलाय पण तरीही मला त्याचं उत्तर सापडलं नाही. असो बहुदा प्रत्येक घरी ही समस्या असणार आहे . त्यात बायको हे पात्र या समस्येत असल्यामुळे तसा विषय गंभीरच... या सगळ्यात माझी रोजची जेवायची वेळ निघून गेली. रोज यावेळी येणारी हाक अजून येत नव्हती... मी समजून गेलो ..... आज काय तशी हाक येणार नाही. म्हटलं आता स्वतःच उठावं जावं आत.... देवा अशी एखादी शक्ती दे रे बाबा आम्हाला की ज्यामुळे ही समस्या आमच्यापुढे उभी राहणार नाही......🙏
रोहित पाटील
9421345159
No comments:
Post a Comment