ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए,


ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए,

 वरना परिस्थितीयां तो सदैव ही विपरीत होती है

आज डायरी उघडताच इंस्टाग्राम वर वाचलेलं हे वाक्य मनात घोळु लागलं होतं. कारण आजचा दिवसही काही फारसा सोपा नव्हता. कुठल्याही परिस्थिती चा सामना करताना समाजाचा विचार करणं कितपत योग्य आहे. मला असं वाटतय कि समाजाचा विचार करावा पण त्यावेळी स्वतःला विसरून त्याचा विचार करावा हे मला पटत नाही. आज एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली परिस्थिती बदलत नाही तोवर आपल्यालाच बदलावं लागतं. मनातल्या इच्छा जपण्यासाठी, आपल्याला स्वतःच्या स्वभावात बदल हा करावाच लागतो. आपल्या इच्छांसाठी कुणी वाट मोकळी करून देत नसतं, ती आपल्यालाच शोधावी लागते. मनामध्ये थोडी भीती, शंका, आणि भरपूर प्रश्न असले तरीही एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं असतं

आपल्या आयुष्याची जबाबदारी आपल्यालाच उचलवी लागते समाज तिथे कुठेच नसतो. स्वतःचा आवाज दाबून समाजाचा गोंधळ ऐकत बसलो तर आयुष्य कधीच शांत होणार नाही समाजाचा विचार करताना आपण बऱ्याचदा लोक काय म्हणतीलअसा विचार करतो. पण हे लोक आपल्यासोबत रात्र जागून काढत नसतात. ते लोक आपल आयुष्य जगत नसतात. लोकांना फक्त एक काम असतं आपल फुकटच मत व्यक्त करायचं बाकी काही नाही. कधी कधी लोक चांगलं मत व्यक्त करतात. पण ते फक्त आपल्या दुःखावर घातलेली फुंकर असते एवढंच....


माझी शाळा.....

          माझी शाळा......
आज सकाळ पासून पाऊस म्हणजे मी म्हणतोय... थांबला म्हणतोय तोवर पुन्हा धो-धो कोसळायला सुरु... शाळेत आज पाऊस बघतच दिवस गेला. पण एक गोष्ट आज चांगली घडली आज लिहायला विषय मिळाला. ......‘शाळा’ ..... सहज विचार करत बसलो होतो. मला वाटतं शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचं मंदिर नाही, तर ती आपल्या बालपणीच्या आठवणींचं गहिवरलेलं स्थान असतं. शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी आपल्या आयुष्यात असंच एक अविस्मरणीय स्थान घेऊन त्याच स्वप्न पूर्ण करायला भरारी घेतो. आणि त्या भरारीसाठी लागणारी पहिली झेप घेण्याची ताकद ही शाळाच देत असते. 
         आता थोडं माझ्या शाळेबद्दल...... ‘भोसे’...... दोन डोंगरांच्या कुशीत वसलेलं,  द्राक्ष आणि उसाच्या हिरवळीनं  नटलेलं, रत्नागिरी-नागपूर हायवेवरून जाणाऱ्या प्रत्येकाला आपलं सौंदर्य थाटात दाखवणारं गाव म्हणजे आमचं भोसे गाव आणि अशा गावात आहे माझं हायस्कुल स्वातंत्र्यवीर नेमू सत्याप्पा चौगुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भोसे.
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या, माझ्या गावच्या प्रेमळ माणसांच्या आणि चहूबाजूची हिरवळ, मोकळं आकाश, शांत वातावरण या सगळ्याच्या साक्षीने माझं हायस्कुल अगदी थाटात उभं आहे. लाल मातीचं मैदान, दुमजली टूमदार इमारत त्याला लागून कार्यक्रमाचा स्टेज आणि स्टेजच्या कोपऱ्यावर फडकणाऱ्या झेंड्याचा खांब आणि मैदानाच्या चाहूबाजूनं असणारी झाडं शाळेची शोभा वाढवत होती.
         कितीतरी विद्यार्थ्यांचं हसणं, रडणं किंचाळनं आणि वेगवेगळ्या आवाजात ओरडणं हे सगळं पाहिलेल्या त्या वर्गाच्या भिंतीवर त्या विद्यार्थ्यांची शिकण्याची ओढ देखील कोरलेली आहे. खरं तर पुस्तकापेक्षा हे वर्गच जगण्याचे धडे देतात. याच वर्गात गणिताची सूत्रं शिकवली जातात तर मराठीतून भाषा कशी जिवंत करता येते हेही शिकवलं जातं.
सकाळी प्रार्थना झाल्यापासून ते दुपारी अभ्यास, संध्याकाळी खेळ होईपर्यंत क्वचितच कुणाला घराची आठवण येत असेल.  या सगळ्यात दिवस कसा जातो ते कळतही नाही.
    खरं तर शाळा म्हणजे एक वेगळं जग असतं. असं जग की त्या जगात मित्रच सर्व काही असतात. माझ्या शाळेचंही असंच आहे. शाळा सोडून भले कित्येक वर्षे झाली पण सगळे मित्र मिळून वर्षातून एकदा शाळेत भेटतातच. कारण या वेगळ्या जगातल्या शेवटच्या बाकावरून झालेली मैत्री आणि त्याच्या आठवणी अशा असतात आहेत की त्या आयुष्यभर एकमेकांची साथ सोडू देत नाहीत. 
.    बऱ्याच माजी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल म्हणलं की या शाळेत आम्हाला फक्त शिक्षणच मिळालं नाही तर आम्हाला जगायला पण शिकवलं. आज ही लोकं आयुष्याच्या दुसऱ्या वळणावर आहेत परंतु त्यांच्या प्रत्येक यशमागे शाळेचं योगदान आहे जाणवल्याशिवाय राहणार नाही.

माझं पुस्तक ....

🖋️🖋️🖋️🖋️
माझं पुस्तक 

‘पुस्तक’ .... मग ते शाळेतलं असो वा आयुष्याचं .... मनापासून गोडी लावली की त्याचा लळा लागतोच. आणि त्यानंतर ते वाचणं असो वा जगणं दोन्ही सोपं होऊन जातं. बर्याचदा लोकांचं असं होतं कि ही पुस्तकं पूर्ण समजावून घेण्याआधीच ती निम्म्यावर सोडून मोकळे होतात. पण अशा लोकांच्या हे लक्षात येत नाही कि जसं आपण पुढे वाचत जाऊ,किंवा जगत जाऊ तसे त्याची उत्सुकता वाढत जाते. 
    खरंतर  शाळेपेक्षा आयुष्याच्या पुस्तकातूनच आपण खूप काही शिकत असतो या पुस्तकातलं प्रत्येक पान आपल्याला काहीतरी नवीन दाखवत असतं, शिकवत असतं. या पुस्तकात सुरुवातीची काही पानं अशी असतात की जणू क्षितिजावर असणार्या सूर्याला सलामी देण्यासाठी अख्खं आभाळ जसे लाल-केशरी रंग परिधान करतो तसे आपलं बालपण अनुभवण्यासाठी आपलं कुटुंब करतं. तो काळ असा असतो कि सर्व काही आपल्यासाठीच असतं. त्यातला बराच काळ आपल्यासाठी अविस्मरणीय असतो. 
    त्यानंतर धडा येतो तो आपलं व्यक्तिमत्व तयार करण्याचा आणि त्याला योग्य आकार देण्याचा शाळेमधले, कॉलेजमधले ते दिवस असे असतात कि जणू आयुष्याने या पुस्तकात ठळक अक्षराने ते कोरून ठेवलेले असतात. आणि का बर असू नये ? ..... कारण त्या दिवसाना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळी जागा असते. त्यावेळी आपल्या व्यक्तिमत्वाची मूर्ती घडवत असताना आपल्या आई-वडिलांनी, आपल्या शिक्षकांनी जे घाव आपल्यावर घातलेले असतात ते संपूर्ण आयुष्यभर आपल्या लक्षात राहतात आणि तोच काय तो बऱ्याच जणांच्या आयुष्यातला पहिला टर्निंग पॉईंट ठरतो. 
    आता मात्र यानंतर चा काळ म्हणजे आयुष्याच्या पुस्तकात आलेली एक सुंदर कविता असते. जवळ जवळ शिक्षण पूर्ण होऊन आपण नोकरीला किंवा कामधंद्याला लागलेलो असतो. आणि त्यावेळी भावनेच्या ओळीमध्ये रेखाटलेली, सुखाच्या रंगांनी आणि दुःखाच्या वेदनांनी गुंफलेल्या या कवितेच्या प्रत्येक ओळीवर जबाबदारीची एक झालर ओढलेली दिसून येते. या जबाबदारीच्या वेलीवर कष्टाने झिजलेली पाने आणि मनासारखं फुलण्यासाठी काट्यातून काढला जाणारा मार्ग याच गोष्टी खऱ्या अर्थाने आपल्याला जगायला शिकवितात. 
    पुस्तकाच्या शेवटी येणाऱ्या पानांचा अनुभव मी तर अजून घेतला नाही पण बऱ्याच जणांकडे पाहून एवढं मात्र लक्षात आलं कि शेवटची काही पानं अशी असतात की त्यातून आपल्याला काही केल्या बाहेर पडता येत नाही. आयुष्यभर आपण हे पुस्तक जसे हाताळतो तसेच धडे ते आयुष्याच्या शेवटी आपल्याला दाखवत असतं. पण त्यामध्ये एक गोष्ट मात्र सत्य आहे कि या आयुष्याच्या पुस्तकात असे असंख्य क्षण आपल्यासमोर येतात ज्यांचे रहस्य कधीच उलगडले जात नाही. आणि आपणही कधी तसा प्रयत्न करत नाही.   .........   धन्यवाद 
             
                                                        रोहित पाटील 
                                                      9421345159

*जबाबदारीचा साखळदंड*

🖊️🖊️🖊️🖊️🖊️
जबाबदारीचा साखळदंड…

दिन कुछ ऐसें गुजरता है कोई की
जैसे एहसान उतारता है कोई |
दिल मे कुछ यु संभालता हूं गम
जैसे जेवर संभालता है कोई ||
      आज सकाळी या ओळी ऐकल्या आणि थोडा विचार केला की आपण जगतोय की जगवतोय. रोज सकाळी दिवसाची सुरुवात करताना देवाचं नाव घेतो आणि त्यावेळी काहीतरी मागताना आपण कितीदा स्वतःसाठी काहीतरी मागतो बरं ?  … अगदी क्वचित, कारण नेहमी आपल्या समोर आपलं कुटुंब असतं. आणि ते खुश ते समाधानी तर आपण खुश आपण समाधानी असच समीकरण झालं आहे. 
       एक गोष्ट खरी आहे की सर्वांना सांभाळून घेणाऱ्याला सांभाळणारे खूप कमी असतात. खरंच आहे त्यानं आपली दुःख कुणाला सांगायची नसतात, त्यानं आपली स्वप्न कुणाला बोलून दाखवायची नसतात, त्यानं स्वतःसाठी वेळ काढायचा नसतो, एवढंच काय तर त्यानं स्वतःची इच्छा सुद्धा कुठं व्यक्त करायची नसते कारण त्याला भीती असते आपण तसे जर केले तर कदाचित आपल्या पत्नीची किंवा मुलांची, आई वडिलांची इच्छा, स्वप्न मागे पडतील, राहून जातील. अशा लोकांचं असं असतं की आपल्या आई-वडिलांच्या आजाराची औषधं आणायला गेल्यावर स्वतःची औषधं संपलेली असतात हे देखील तो विसरतो. कुटुंबाला घेऊन एखाद्या दिवशी बाहेर गेलाच तर त्यांच्या आवडीचे खाऊ खायला घातल्याशिवाय परत आणणार नाही. पण स्वतः रोज बाहेर असतो तरी स्वतःच्या आवडीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणार. प्रत्येक दिवाळीला घरातल्या सगळ्यांना नवीन कपडे आणणार पण स्वतःसाठी का आणलं नाही विचारलं तर काहीतरी करण सांगून विषय बदलणार. कामावरून दमून भागून आल्यानंतर रोज बनियन वर वाऱ्याला बसणारा माणूस जेव्हा शर्ट घालून बसतो तेव्हा त्याच्या मनात एकच असतं आपल्या पोरांनी आपली फाटकी बनियन बघू नये. कारण त्या पोरांना फाटकी बनियन घालूनच काय बघून देखील माहीत नसतं. आणि हे सगळं फक्त एक जबाबदार 'बापच' करू शकतो. 
         परवा एकदा मी काही ओळी ऐकल्या एक मुलगा आपल्या बापाला विचारत असतो ….. का बाबा का ? तुम्ही माझ्या मित्रांच्या बाबांएवढे श्रीमंत का नाही …. ? बापाने काहीच उत्तर दिलं नाही …एक शब्द देखील बापाच्या तोंडून निघाला नाही…… फक्त भरल्या ओल्या डोळ्याने बाप आपल्या मुलाकडे एकटक बघत राहिला. नुसता त्या भरल्या डोळ्यांकडे बघतानाच मुलाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. कारण वातावरणाचा हाल त्याला कधीच विचारू नये ज्याने आपल्या सुखासाठी ऊन बघितलं नाही,सावली बघितलं नाही,पाऊस बघितला नाही, थंडी बघितली नाही दिवसरात्र फक्त कष्ट आणि कष्टच बघितले. ज्याची आयुष्याची कमाई तुम्ही-आम्ही आहोत त्याला कधीच विचारू नये की तुम्ही कमावलं काय……..
          या जबाबदारी च्या साखळदंडाला जखडून राहिलेला तो बाप…..  हे सगळं समर्थपणे निभावत असतो कारण त्याच्या सोबत त्याची पत्नी म्हणजे आपली 'आई'देखील असते. कारण बापाच्या डोळ्यातलं पाणी त्याने डोक्याखाली घेतलेल्या उशीनेच ओलंचिंब होऊन आईला सांगितलं असतं. पण आई देखील आईच असते कुणालाच काय बापाला सुद्धा त्याची खबर लागू देत पण त्याची साथ कधीच सोडत नाही. कारण त्या साखळदंडाची एक साखळ तिच्या सुद्धा काळजाला जखडलेली असते. 


                                                 रोहित पाटील 
                                               9421345159

दिसामाजी काहीतरी लिहावं....🖊️🖊️

*दिसामाजी काहीतरी लिहावं.....*          

          रोज काहीतरी छान लिहावं असं खुप वाटतं. कारण असं म्हणतात की दिसामाजी काहीतरी लिहावं. मी हे बऱ्याचदा ऐकले आहे. मला लिहायला खूप आवडतं कारण त्यावेळी मी व्यक्त होत असतो, स्वतःशीच का होईना पण मनापासून आणि मनमोकळेपणाने बोलत असतो,  त्यावेळच्या बोलण्याला कशाची भीती नसते वा कुठलीही बंधने नसतात. पण रोजच्या रोज असे मनाच्या सागरातुन विचारांचे मोती बाहेर काढणं हे देखील वाटते तितके सोपे नाही. जीवनाच्या वाटेवर अनेक प्रसंग आपल्यासमोर येतात की त्यांचा आपल्या जीवनावर बराच प्रभाव पडत असतो. ते प्रसंग काही वाईट असतात तर काही चांगले देखील असतात.ते सर्व प्रसंग आपण आपल्या लेखनीद्वारे कागदावर उतरवले पाहिजे असे मला वाटते. आपलं व्यक्तिमत्व सुधारण्याची व आदर्श बनवण्याची एक उत्तम संधी आपल्याला त्याद्वारे मिळत असते.
              खरं तर रोज डायरी लिहिली पाहिजे या गोष्टीचा मी खूप आग्रही आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांनाही  नेहमी सांगतो. विद्यार्थांनाच नव्हे तर माझ्या मित्र परिवरामध्ये देखील सांगण्याचा प्रयत्न करत असतो. लेखनाचे महत्व किती आहे. आजपर्यंत आपल्याला अनेक साहित्यिकाच्या कार्यातून दिसूनही आले आहे. 
               डायरी लिहिल्यामुळे आपल्यातील गुण दोष काय आहेत हे आपल्याला समजते त्याची पडताळणी आपल्याला करता येते आयुष्यातल्या महत्वाच्या किंवा अविस्मरणीय गोष्टी आपल्याला डायरित उतरवुन जपून ठेवता येतात अणि कधीतरी काढून त्या गोष्टी वाचत बसलो कि त्या आठवणींच्या ओलाव्यात कधी आपण चिंब भिजून जातो आपल्याला कळत नाही. आणि चेहऱ्यावर एक वेगळच स्मितहास्य उमटतं. ते वाचत असताना मनाला जो आनंद मिळतो तो काही औरच असतो. खरं तर मलाही खूप उशिरा या गोष्टीच महत्व समजल. पण जेव्हा समजल तेव्हा पासून माझ्या आयुष्यातली एक आणि एक अविस्मरणीय गोष्ट मी लिहून ठेवली आहे. आज त्या उघडून वाचायला लागलं कि कधी तास दोन तास निघून जातात कळत नाही. शिवाय मनाला मिळणार सुख ते वेगळच. म्हणून माझी नेहमी सगळ्यांना सांगनं असतं कि दिवसातून निदान चार वाक्य तरी स्वतःबद्दल लिहाव. आपल्यात काय  बदल होतो हे मी सांगण्यापेक्षा ज्याला त्यालाच नक्की कळेल.

                              रोहित पाटील
                            9421345159

वासुदेव आला हो…..



वासुदेव आला हो…..


         वासुदेव आला हो .....वासुदेव आला .....सकाळ च्या पारी हरिनाम बोला.....हो वासुदेव आला....

आजची सकाळ या ओळी कानावर घेतच झाली. पहिल्यांदा वाटलं रेडिओ वर गाणं लागलं असेल पण थांबून थांबून तो आवाज यायला लागला मग मात्र पक्कं झालं की खरंच आज घरासमोर वासुदेव आला होता. लगबगीने उठून गॅलरीत जाऊन बघितलं अजून लांब होता. वाऱ्याच्या वेगानं आवरून लगेच खाली गेलो अजून ही तो आमच्या घरासमोर आला नव्हता. थोडा वेळ थांबलो का कुणास ठाऊक पण त्याला भेटायची प्रचंड इच्छा होत होती. आणि मग एकदाचा तो माझ्या समोर येऊन उभा राहिला. दोन्ही पाय जुळवून हात कमरेवर ठेवले आणि त्या सकाळच्या प्रहरी साक्षात विठुरायाचं दर्शन त्यानं मला घडवलं.अंगभरून पांढरा सदरा, त्यावर लाल सोनेरी पट्टीने स्वस्तिक चा आकार,  हातात टाळ-चिपळ्या,  कपाळी विठू माऊलीसारखा गंध, गळ्यात विविध देवांच्या माळा, कमरेला बासरी, डोक्‍यात लाल रंगी आणि त्याला सोनेरी कडा असलेली निरनिराळ्या माळांनी गुंफलेला मोरपिसाचा टोप, आणि त्या टोपीवर विठ्ठल रखुमाई च्या लहानशा मूर्त्या आशा काही ठेवलेल्या होत्या की समोरचा बघताच क्षणी हात जोडल्याशिवाय राहणार नाही.  असं मनाला हवंहवंसं वाटणारं देखणं मी रूप डोळे भरून न्याहाळत होतो. थोडा वेळ थांबून त्यानेच पुन्हा विठ्ठलाचं गुणगान गायला सुरुवात केली.

         गाणं संपवून प्रसन्न आणि हसऱ्या चेहऱ्याने त्याने त्याची कला दाखवायला सुरुवात केली. आणि माझ्या सोबत उभ्या असलेल्या लहानग्या पुतण्याकडे पाहून त्याच गोड कौतुक त्याच्या सुरेल वाणीने केलं. त्याचं सगळं झाल्यानंतर मी थोडी विचारपूस करण्याच्या हेतूने त्याच्याशी चार गोष्टी बोललो तेव्हा त्याने सांगितलं की बारामती तालुक्यातुन आलेला हा अवलिया पोटाची खळगी भरायला गावोगावी फिरतो असं सांगितलं. पूर्वी सारख लोकं आता आम्हाला जास्त महत्व देत नाहीत असं त्याच्या बोलण्यातून जाणवलं . आणि खरंच आहे पूर्वी गावात वासुदेव आलाय म्हणलं तर अख्खं गाव हातातलं काम सोडून त्याच्याशी चार गोष्टी बोलायचं, आणि घरातलं जे काही धान्य असायचं त्यातलं सुप भरून धान्य त्याला द्यायचं , खूप मानमरातब मिळायचा त्यांना पण आजची परिस्थिती वाईट झालीय त्याने घरात येऊन हाक मारली तरीही घरातुन कोण बाहेर येत नाहीत. त्याच्या हातातील टाळ-चिपळ्या चा ताल कानाला एक वेगळ्याच प्रकारचं समाधान देऊन जायचा...ज्यामुळे संपूर्ण दिवस आनंदात आणि समाधानाने पार पडायचा. जाता जाता मी आणि त्याने दोघांनी एकमेकांना हात जोडला आणि त्याने पुढची वाट धरली. आषाढी एकादशी जवळ आलीय माझ्या शाळेच्या वाटेवर अनेक वाऱ्या पंढरीला जाताना दिसतायत पण मला आज माझ्या घरीच साक्षात  विठुमाऊलीनं दर्शन दिल्याचं जाणवलं आणि माझ्या दिवसाची सुरुवात एका संस्मरणीय घटनेनं झाली  या समाधानानं मी पुढच्या कामाला लागलो. खरं तर आजची सकाळ अशी होईल ही अजिबात अपेक्षा नव्हती. चला 

....जय हरी विठ्ठल....🙏🙏

                                           --  रोहित पाटील

                                             9421345159

आठवणींची शिदोरी.....


🖊️🖊️🖊️🖊️🖊️

आठवणींची शिदोरी...


      " मैं जिंदगी का साथ निभाता चला गया , हर फिक्र को धुएं मे उडाता चला गया….." आज खूप दिवसांनी हे गाणं ऐकलं. अगदी शांत डोळे मिटून एकदा ,दोनदा नाही तर तब्बल तीनदा पुन्हा पुन्हा ऐकलं …गाणं ऐकता कधी त्या आठवणींच्या खिडकीपाशी गेलो आणि त्या खिडकीतून येणाऱ्या अविस्मरणीय क्षणांची थंडगार झुळूक मनाला गारवा देऊन गेली कळलंच नाही…… 

         सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यात आंब्याचा सिझन…तुम्हाला सांगतो माझं गाव पूर्वी आंब्यासाठी खूप प्रसिद्ध असायचं पूर्वी म्हणे घरटी 4-5 तरी आंब्याची झाडे असायचीच गोटी आंबा म्हणायचो त्याला कारण त्याचा आकार तसाच होता. सुट्टी लागली की आमचा एकच कार्यक्रम असायचा सकाळी लवकर उठायचं आणि रानात जाऊन आंब्यांची राखण करायची कारण पांदीला रान होतं आमचं त्यामुळे वर्दळ जरा जास्तच होती. आणि आंबे तर असे असायचे की झाडाला लटकलेले बघूनच तोंडाला पाणी सुटायचं….. मग काय  जाता - येता कोण दगड मारणार नाही तो आळशी….. अस समीकरण झालं होतं. त्यामुळे सकाळी आम्ही घरातील मुलं लवकर उठून रानात यायचो नंतर जेवण करून आजोबा यायचे आणि आमची सुट्टी व्हायची ….. तिथून पुढे पोहण्याचा कार्यक्रम असायचा गावात एकच बांधीव विहीर होती त्या एका विहिरीत आख्ख गाव पोहायला यायचं नंतर नंतर तर अशी परिस्थिती झाली की पोहताना हात फिरवला की कुणाला तरी लागणारच…..  एवढी गर्दी व्हायला लागली. हे सगळं बघून एकदा विहिरीच्या मालकांनी विहीर पोहण्यासाठी बंद करून टाकली. 

            संध्याकाळी कट्ट्यावर ज्या गप्पा रंगायच्या त्याच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर शब्द अपुरे पडतील …. आमच्या दोस्तांना शाळेच्या पेपर मध्ये दोन अंकी गुण मिळतील की नाही माहीत नव्हतं पण कट्ट्यावर गावातल्या एखाद्याच्या भावकितला तिढा आमच्याच चर्चेत अगदी लीलया सोडवायचे. रात्री झोपायला आम्ही गच्चीवर असायचो. कधी मामा म्हणल्या जाणाऱ्या चंद्राला बघून डोळा लागायचा तर कधी लांब पसरलेले तारे मोजत स्वप्नात रमून जायचो. 

         खरंच …. तो लहानपणीचा सोनेरी काळ ते गावातील सुंदर, स्वच्छ वातावरण ….. दिवसभर दम न घेता खेळलं फिरलं हुंदडल कंटाळा यायचा नाही आणि आलाच तर संध्याकाळी सहा वाजले की आमच्या गावच्या मारुतीच्या देवळात स्पिकर लागायचे त्यावर मस्त भक्तीगीत किंवा भजनं लावली जायची त्यामुळे अख्ख्या गावातलं वातावरण रोज भक्तिमय आणि चैतन्यमय होऊन जायचं …. त्यावेळी त्या भक्ती गीतांचा भजनांचा अर्थ जरी समजत नसला तरी ते ऐकून दिवसातील किती तरी वेळा आमच्या तोंडून ते गुणगुणलं जायचं. त्यामुळे ते दिवस सर्वांच्याच आयुष्यातले अविस्मरणीय दिवस होते.

          ही सगळी आठवणींची शिदोरी घेऊन आम्ही कधी या धावत्या युगात आलो कळलंच नाही. आणि गाव देखील या युगात पार बदलून  गेलंय. आजही गावातल्या झाडांना आंबे लागतात पण त्याला दगड मारायला कुणाला वेळच नाही. विहिरीत पोहणे ही संकल्पनाच जणू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आज मी माझ्या मुलीला घेऊन स्विमिंग पूल मध्ये जातो खरा पण तिथल्या पोहोण्यातल्या मजेची सर इथे येत नाही…गावात आजही मंदिरावर स्पीकर लागतो पण तो ऐकायला कुणालाच सवड नाही…. आवडीचा तर विषयच नाही. राना-वनात भटकायचं तर डोक्यावर टोपी असून सुद्धा आपल्याला ऊन लागतं. मुळात चालत फिरणे म्हणजे आता मोठं कष्टाचं काम झालंय. 

            एका गोष्टीचं वाईट वाटतंय की त्यावेळी डायरी लिहायची सवय नव्हती नाहीतर ही शिदोरी आज  जगायला एक वेगळी दिशा दाखवताना खूप मोलाची ठरली असती हे नक्की ….. 


                                        रोहित पाटील 

                                      9421345159

         

ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए,

​ ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए ,   वरना परिस्थितीयां तो सदैव ही विपरीत होती है … आज डायरी उघडताच ...